शासन करतेय शेतकऱ्यांची बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:50 PM2018-04-22T23:50:19+5:302018-04-22T23:50:19+5:30
सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली;....
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अन्याय दूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, शेतमालाला हमीभाव देऊ आदी आश्वासने दिली; पण केंद्र व राज्यात सत्ता येऊनही आश्वासन न पाळता शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे, असा आरोप पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी केला.
शेतकरी संघटनेद्वारे सेवाग्राम ते आकोट तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे शहरात आगमन झाले असता विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने देशात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करून बेरोजगारांना नोकºया देऊ, पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊ यासह अनेक आश्वासने दिली होती; पण चार वर्षे लोटूनही आश्वासनांची पूर्ती केली नाही. शेतकरी कर्जातच जन्मला व कर्जातच मरत आहे. कर्जापायी आत्महत्या करीत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. शेतीला भविष्य नाही. या दुहेरी संकटात गावातील तरूण आहे. राज्यात सेना-भाजपाचे राज्य असताना शिवसेना सम्राटांनी २७ लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली. या रोजगार देण्याच्या घोषणा तर दूरच; पण भाजप शासन विद्यमान नोकऱ्यांत ३० टक्के कपात करीत आहे. स्वतंत्र विदर्भ देण्याची ग्वाही दिली होती; पण त्याकडेही पाठ फिरविली. आता शेतमालाचा भाव व बेरोजगारांची समस्या सोडविण्यासाठी संघटीतपणे एकत्र येऊन पुढील आंदोलनाचे धोरण ठरविण्यासाठी आकोट येथे विदर्भस्तरीय शेतकरी युवा मेळाव्यासाठी ही तिरंगा यात्रा जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी सतीश दाणी, गणेश मुटे, प्रमोद तलमले, गजानन निकम, नंदकुमार काळे, ब्रिजमोहन राठी व कार्यकर्ते हजर होते.