शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:40 PM2020-03-28T20:40:55+5:302020-03-28T20:41:25+5:30
संचारबंदीच्या काळात सकाळी सहा वाजतापासून पोलीस शिपायाचे कर्तव्य सुरू होते. मुख्य चौकात कर्तव्य बजावताना सायंकाळपर्यंत पाण्याचा थेंबही पोटात जात नाही. तरीही उपाशीपोटी चौकापासून ते गावखेड्यांच्या सिमांपर्यंत चोख कर्तव्य बजावले जात आहे. त्यांच्यामुळेच कोरोनाशी दोन हात करण्यास आम्ही यशस्वी होत आहोत. किमान त्यांच्या पोटाची सोय व आरोग्य सुरक्षा त्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र, या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन मात्र, रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विम्याची सोय लावत असताना रस्त्यावरच्या सैनिकांसाठी मात्र, शासनाकडे सॅनिटायझर किंवा मास्कचीही तरतूद नाही, हे खाकीचे दुदैव की गृहत धोरणाच्या परंपरेचा भाग, हा प्रश्न सुन्न करणारा आहे.
मागील आठ दिवसांपासून संपूर्ण देश घरामध्ये बसला आहे. मात्र, रुग्णालयात आरोग्य कर्मचारी तर रस्त्यावर पोलीस कर्मचारी कोरोनाच्या आगमनाला धैर्याने सामोरे जात आहेत. १६-१६ तास रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. शासनाने नुकताच आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखाच्या विम्याचे कवच बहाल केले आहे. ही बाब स्वागताहार्य असली तरीही, त्याच धर्तीवर किंबहुना अपुऱ्या साधनानीशी अतिशय धक्कादायक स्थितीत रस्त्यावर कोरोनाशी लढा देणारे पोलीस प्रशासन शासनाच्या लेखी पुन्हा दुर्लक्षीत राहिले असल्याचा मतप्रवाह आहे. दवाखान्यामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरणासाठी रसायने व पुरेशा संरक्षक कपड्यांची व्यवस्था आहे. पोलीस मात्र रस्त्यावर विना सुरक्षेने कोरोनाचा मुकाबला करीत आहेत.
संचारबंदीचे नियम पोलिसांनाही लागू करा
संचारबंदीच्या काळात सकाळी सहा वाजतापासून पोलीस शिपायाचे कर्तव्य सुरू होते. मुख्य चौकात कर्तव्य बजावताना सायंकाळपर्यंत पाण्याचा थेंबही पोटात जात नाही. तरीही उपाशीपोटी चौकापासून ते गावखेड्यांच्या सिमांपर्यंत चोख कर्तव्य बजावले जात आहे. त्यांच्यामुळेच कोरोनाशी दोन हात करण्यास आम्ही यशस्वी होत आहोत. किमान त्यांच्या पोटाची सोय व आरोग्य सुरक्षा त्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे. संचारबंदीमध्ये कर्तव्य बजावताना कर्तव्याच्या ठिकाणी भोजन व इतर सोयी देण्याचा निर्णय येथेही लागू झाला पाहिजे. उपाशापोटी कर्तव्य बजावण्याची दुदैवी वेळ शिलेदारांवर येणार नाही.
साधनांची कमतरता, तरी देश प्रथम!
रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना प्रशासनाकडून कोणतेही साहित्य दिले जात नाही. औषधींच्या दुकानांवर मास्क नाहीत. आरोग्य यंत्रणा दर अर्ध्या तासाने साबण व सॅनिटायझर स्वच्छ करणयाचे सांगते. मात्र, या पोलिसांना रस्त्यावर ना सॅनिटायझरची सोय आहे, ना पाण्याची सोय आहे. अशा परिस्थितीतही हे खाकीचे शिलेदार देशातील नागरिकांसाठी आपलाजीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.
नागरिकांनो, थोडातरी संयम बाळगा
संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठीच पोलीस कर्तव्यावर आहेत. नागरिकांना या जीवघेण्या आजाराची लागण होवू नये, हाच उद्देश आहे. ते आपल्या घरात स्वस्थ बसण्याची विनवणी करीत असताना ते कुटुंबापासून आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून दूर राहून रस्त्यांवर कोरोनाशी मुकाबला करीत आहेत. त्यांनी एखाद्यावेळी बळाचा वापर केला तर त्याचा कांगावा केला जातो. मात्र, त्यांच्या ठिकाणी एकदा स्वत:ला ठेऊन विचार करा, परिस्थितीचे गांभिर्य ओळखून थोडा संयम बाळगा, तरच या आजाराशी लढता येईल.