आठ वर्षांपूर्वीची ग्रा.पं. कार्यालयाची इमारत दाखविली जीर्ण

By admin | Published: June 6, 2017 01:13 AM2017-06-06T01:13:50+5:302017-06-06T01:13:50+5:30

स्थानिक ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी शासनाने निधी दिला; पण या बांधकामासाठी ८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली...

Gram Panchayat 8 years ago The office building showed the dilapidated | आठ वर्षांपूर्वीची ग्रा.पं. कार्यालयाची इमारत दाखविली जीर्ण

आठ वर्षांपूर्वीची ग्रा.पं. कार्यालयाची इमारत दाखविली जीर्ण

Next

पत्रकार परिषद : ग्रा.पं. सदस्य अशोक येळणे यांची माहिती, वरिष्ठांकडे दाद मागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : स्थानिक ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी शासनाने निधी दिला; पण या बांधकामासाठी ८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत जीर्ण दाखवून ती पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत खरच जीर्ण झाली काय, असा प्रश्न ग्रा.पं. सदस्य अशोक येळणे यांनी उपस्थित केला आहे. या इमारतीची पुन्हा पाहणी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रा.पं. भवनाकरिता १२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे; पण ग्रा.पं. कमिटीने या निधी व्यतिरिक्त १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडून कर्जरूपात मंजूर केला आहे. ग्रामपंचायत भवन बांधण्यासाठी कर्ज घेण्याची गरज होती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थांवर कर्जाचा डोंगर उभा करून भवन बांधू नये, अशी मागणीही होत आहे. करापोटी ग्रा.पं. ला मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्ज कपात झाल्यास ग्रामस्थांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास अडचण जाणार आहे. यामुळे आठ वर्षांपूर्वी बांधलेली ग्रा.पं. कार्यालयाची इमारत चांगली असून ती पाडू नये. शासनाकडून प्राप्त झालेल्या १२ लाख रुपयांच्या निधीतून ग्रा.पं. भवन बांधावे, अशी मागणी येळणे यांनी केली आहे. यासाठी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल हजर होते.
२५ मे रोजी पंचायत समितीने घोराड ग्रा.पं. पत्र दिले असून जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याची कार्यवाही करावी. याला तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी प्रदान केल्याचे नमूद आहे. इमारत पाडण्याबाबत लिलावाची कार्यवाही करण्यासाठी ३० मे रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव घेतल्याने खळबळ माजली. ही सभा आचारसंहितेत झाली असून सुचीवर हा विषय नव्हता, असा आरोप येळणे यांनी केला. या प्रकरणी काय निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

खरचं ती इमारत जीर्ण झाली काय?
२००८ मध्ये घोराड येथे ३७४ चौरसफुट जागेत ४ लाख रुपये खर्च करून ग्रा.पं. कार्यालय बांधण्यात आले. दीड वर्षापूर्वी याच कार्यालयात हजारो रुपये खर्च करून टाईल्स बसविण्यात आली. ग्रा.पं. भवनाकरिता १२ लाख रुपये मंजूर होताच ती इमारत जीर्ण दाखविण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या पाहणीत इमारत जीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले. यावरुन शासकीय निधीची ही उधळपट्टी होत असल्याचेच दिसते. ग्रा.पं. ची जुनी व नवीन, अशा दोन इमारती पाडण्याचा आदेश प्राप्त झाला आहे; पण ग्रा.पं.ची जुनी इमारत कोणती, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ग्रा.पं. ला लागून असलेली जी जुनी इमारत दाखविली आहे, ते समाज मंदिर आहे. या इमारतीत एचडीएफसी बँक कार्यरत आहे.
बँकेने या इमारतीचे तीन वर्षांपूर्वी नुतनीकरण केले आहे. यामुळे खरच ती इमारत जीर्ण आहे काय, हा प्रश्नच आहे. सदर इमारत जीर्ण आहे काय, हे ठरविण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत पाहणी करावी, यासाठी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे ग्रा.पं. सदस्य अशोक येळणे यांनी सांगितले.

ग्रा.पं. कमिटीने ठराव घेऊन संबंधितांकडे पाठविला. अभियंता व गटविकास अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्या इमारती पाडण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. त्या पत्राच्या आधारे ३० मे रोजी झालेल्या मासिक सभेत अध्यक्षाच्या परवानगीने लिलावाबाबत विषय मंजूर करण्यात आला.
- संजय धावडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. घोराड.

Web Title: Gram Panchayat 8 years ago The office building showed the dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.