ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:26 PM2019-02-21T22:26:01+5:302019-02-21T22:26:58+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा अखेर बिगुल वाजला. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा अखेर बिगुल वाजला. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्याची आदर्श आचारसंहिता बुधवारी रात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे.
लोकसभा निवडणुका आधी होणार की ग्रामपंचायतींच्या निवडणुका? असा प्रश्न मतदारांसह राजकीय मंडळींनाही पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमातून मिळाले. जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१९ ग्रामपंचायती असून त्यापैकी ३२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुका होणार आहे. निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागासाठीही आचार संहिता लागू राहणार असल्याने अनेकांच्या अडचणी वाढल्या आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावागावांत आता उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. विशेषत: सरपंच हा मतदारांतून निवडून द्यायचा असल्याने, सरपंचपदाचा उमेदवार शोधण्यासाठी मोठी फिल्डिंग लावल्या जात आहे. त्यातही काही सरपंचपद हे आरक्षित असल्याने आरक्षणानुसार उमेदवार शोधताना एकाच्या दारात अनेकांच्या येरझारा सुरू आहे. या निवडणूक कार्यक्रमाने जिल्ह्यात आता चांगलीच राजकीय रंगत पाहावयास मिळणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता असलेला राज्यातील एकमेव जिल्हा
जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ५१९ ग्रामपंचायती असून त्यापैकी तब्बल २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी निवडणूका होणाºया ग्रामपंचायतींची टक्केवारी ही ५७.४१ इतकी होत असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच आचार संहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील ३३६ जिल्ह्यापैकी एकमेव आहे.
आचारसंहिता साधारणत: तीन महिन्यांपर्यंत राहणार असून या कालावधीत भूमिपूजन, लोकार्पण, धोरणात्मक निर्णय, नवीन प्रकल्प व योजना, घोषणा, नियुक्ती, कार्यारंभ आदेश तसेच निवड प्रक्रिया राबविता येणार नाही. नियुक्त्यांकरिता परीक्षा झाली असल्यास निकाल व मुलाखती घेता येणार नाहीत. सोबतच मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कार्यक्रम घेण्यासही बंदी आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाई, दुष्काळ, गंभीर आजार यासह अतिमहत्त्वाच्या गरजांसाठी मदत देता येणार आहे. या आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता निवडणूक विभाग कामाला लागला आहे. याकरिता निवडणूक मदत कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
उपजिल्हाधिकाºयांची रिक्तपदे भरली
उपजिल्हाधिकाºयाची पदे मागील मागील कित्येक दिवसांपासून रिक्त होती. निवडणुकांच्या अनुषंगाने ही रिक्त पदे भरली. त्यामध्ये ठाणे येथील उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन (सामान्य), तसेच चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी आर.एम.जैन यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन (उर्ध्व वर्धा प्रकल्प) यापदी नियुक्ती करण्यात आली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तहसीलदारांकडून शुक्रवारी २२ फेब्रुवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात सूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर मंगळवार ५ मार्च ते शनिवार ९ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतादरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाईल. सोमवार ११ मार्चला सकाळी ११ वाजतापासून उमेदवारी अर्जांची छाननी होईल. बुधवार १३ मार्चला दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता वेळ दिला जाईल. त्यानंतर याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यासोबतच निवडणूक चिन्हसुद्धा प्रसिद्ध केले जाईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार २४ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता सकाळी ७.३० वाजतापासून सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.