ग्रामपंचायती पूर्णत: सौर ऊर्जेवर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:35 PM2019-07-26T23:35:16+5:302019-07-26T23:36:13+5:30
भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प ........
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
सेवाग्राम येथील यात्री निवासात सेवाग्राम विकास आराखड्यातील १४५ कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी सूचना दिल्यात. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री आणि अड्याळकर असोसिएटचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये एकूण ७८ कामे हाती घेण्यात आली असून पैकी १८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
पर्यटकांना महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा सहवास लाभलेल्या गावांचा इतिहास, भारताच्या संस्कृतीचे दर्शन आदींची माहिती थ्रीडी चित्र प्रर्दशित करणाऱ्या थिएटरद्वारे देण्यात यावी. गांधींजीचा सहवास लाभलेल्या २५ गांवाना सेवाग्राम सर्किट असे नाव देऊन त्या २५ ग्रामपंचायती पूर्णपणे सोलरवर कार्यान्वित करण्यासाठी ७५ कोटी रुपये देण्यात यावे, यासाठी परिसरात जागा शोधून १ मॅगावॅट वीजनिर्मिती करून सोलर पार्क तयार करावा, या सोलर पार्कमध्ये सोलर शेड तयार करून शेडमध्ये महिला बचतगटांना लघु उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, सेवाग्राम परिसरात ५० एकर जागा उपलब्ध करून बांबू लागवड करावी. या बांबू लागवडीतून रोजगार हमी योजनेवरील मजुरांना कामे मिळून त्यांचा आर्थिक स्त्रोत वाढेल. या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने आराखडा तयार करून तत्काळ सादर करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.
तत्पूर्वी त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेले हुतात्मा स्मारकासमोरील सभागृह, भारतातील सर्वात मोठा चरखा आणि यात्री निवासच्या कामाची पाहणी केली. यावेळी सभागृह परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. बैठकीनंतर त्यांनी बापूकुटीत जात प्रार्थना केली.
दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करा
वर्धा: जिल्हा महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची पावनभूमी आहे. या दारुबंदी जिल्ह्यात देशी-विदेशी दारुविक्री जोमात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात दारुबंदीचे कडक कायदे करून दारुबंदीची कठोर अंमलबजावणी करावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदार आणि दारुबंदी महिला मंडळांची वर्षातून दोनदा संयुक्त बैठक घ्यावी, प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्त केंद्रे सुरू करून दारू तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी, शासकीय कार्यालयात दारुबंदीसंदर्भात जनजागृती फलक लावावी, दारुबंदी महिला मंडळांना मानधन देण्यात यावे तसेच दारूच्या पंचनाम्यावर पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच किंवा दारुबंदी मंडळापैकी एक तरी सदस्यांची स्वाक्षरी असावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाखा प्रत्येक तालुक्यात सुरू करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन महात्मा गांधी दारूमुक्ती संघटनेच्यावतीने पालकमंत्री बावनकुळे यांना देण्यात आले.
घरकुल लाभार्थी महिलेने मागितली आत्महत्येची परवानगी
वर्धा: आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया म्हसाळा येथील रहिवासी असलेल्या अर्चना किसना मसराम यांना २०१७-१८ मध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले. तेव्हा २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर घराचे ले-आऊट टाकून राहते घर पाडण्यात आले. त्यानंतर काही उसनवारी रक्कम गोळा करून घराचा जोता बांधण्यात आला. त्यानंतर बाधकामासंदर्भात ग्रामपंचायत सचिवाला प्रमाणपत्र मागितले असता सचिवाने घर गावठाणात येत नसल्याचे कारण सांगून प्रमाणपत्र दिले नाही. घरकुल मंजूर झाले आणि पहिला धनादेशही निघाल्याने राहते घर पाडले. पण, आता हे बांधकामच रखडल्याने हा परिवार उघड्यावर आला आहे. या संदर्भात न्याय मिळण्याकरिता सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या; पण न्याय मिळाला नाही. सध्या किरायाच्या घरात दिवसे काढावे लागत असून कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एक तर न्याय द्यावा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी अर्चना मसराम यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.