ग्रामपंचायतीचा ग्रामसभेला हरताळ
By Admin | Published: May 8, 2014 11:57 PM2014-05-08T23:57:51+5:302014-05-09T01:49:47+5:30
विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणाऱ्या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत
विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणार्या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत; मात्र महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा विरूळ ग्रामपंचायतीने घेतलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आचारसंहितेचे कारण समोर करून ही ग्रामसभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आर्वी पंचायत समितीच्या अधिकार्याने सर्व ग्रामसेवकांना आचारसंहिता शिथील झाल्याचे संदेश देऊन ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते; पण विरूळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झालीच नसल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़ गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, ग्रामपंचायतीच्या सर्व कामांवर नागरिकांचे लक्ष असावे यासाठी शासनाने ग्रामसभांना महत्त्व दिले.
मतदार यादीत सर्वच नावे असलेल्यांना या ग्रामसभेत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. गावाच्या मतदार संखेच्या १५ टक्के अथवा १०० ग्रामस्थांनी या ग्रामसभेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ज्या दिवशी ग्रामसभा आहे, त्याच्या पहिल्या दिवशी गावातील नागरिकांना दवंडी देऊन कळविणेही आवश्यक आहे; पण विरूळ ग्रामपंचायतीद्वारे कुणालाही कळविण्यात आले नाही़ येथील ग्रामसेविका सकाळी झेंडावंदन करून लगेच गावी गेल्याने महत्त्वपूर्ण ग्रामसभा झालीच नाही. विकासाचा लेखाजोखा ग्रामसभेत मांडणे सक्तीचे झाले आहे. शिवाय कृषी विभागाच्या योजना, लाभार्थी निवड करण्यासह शैक्षणिक कामांबाबत गाव शैक्षणिक पंजिकेचे वाचन करणे गरजेचे आहे.
या ग्रामसभांना ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, पोलीस पाटील यांची उपस्थिती महत्त्वपूूर्ण मानली जाते. असे असताना ग्रामसभाच न घेतल्याने या ग्रामसभेला कुणीही उपस्थित राहिले नाही. शिवाय कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांनाही वाचा फोडता आली नाही़ यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ महत्त्वाची असलेली महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा न झाल्याने शासनाचा सक्त आदेश असताना विरूळ येथे ग्रामसभा न घेणार्यांवर वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)