साटोड्याच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसचिवाला अटक
By admin | Published: September 7, 2016 01:02 AM2016-09-07T01:02:18+5:302016-09-07T01:02:18+5:30
शहरालगत असलेल्या ११ गावातील बांधकाम प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात एका मागाहून पदाधिकारी व अधिकारी अटक होत आहे.
११ गावांतील अनधिकृत बांधकाम प्रकरण
वर्धा : शहरालगत असलेल्या ११ गावातील बांधकाम प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात एका मागाहून पदाधिकारी व अधिकारी अटक होत आहे. यात मंगळवारी साटोडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच नितीन कोंबे (३५) रा. साटोडा व ग्रामसचिव प्रविण मनोहर राऊत (४२) रा. पिपरी (मेघे) या दोघांना पंचायत समिती कार्यालयातून अटक करण्यात आली आहे.
या ११ गावात ग्रामसचिवांनी अनेकांना कुठलेही आदेश नसताना जुन्या तारखेत बांधकाम परवानगी दिली आहे. या संदर्भात ८ फेब्रुवारी २०१६ रोजी येथील प्रमोद मुरारका यांनी सावंगी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत सावंगी ग्रामपंचायतीमध्ये मागील तारखेमध्ये परवानग्या देवून शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात चौकशी करून पोलिसांनी सावंगी ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासात अनेक बाबी समोर आल्याने अटकसत्र सुरू झाले आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत ग्रामपंचायत सावंगी (मेघे) येथील तत्कालीन सरपंच उमेश जिंदे, ग्रा.पं. बोरगाव मेघेचे तत्कालीन ग्रामसेवक विलास रंगारी व ग्रामपंचायत सावंगी (मेघे)चे तत्कालीन ग्रामसेवक संजय मोरे व तत्कालीन ग्रामसेवक सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे) हरिदास रामटेकेला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पराग बी. पोटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे यांच्यासह हवालदार गिरीश कोरडे, संजय ठोंबरे, किशोर पाटील, रवी रामटेके, गजानन महाकाळकर, आशिष महेशगौरी व चालक मुकेश येल्ले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.(प्रतिनिधी)