पुरात आजोबा अन् नात गेली वाहून, प्रशासनाकडून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:10 PM2024-09-01T12:10:21+5:302024-09-01T12:10:52+5:30
नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नात वाहून गेल्याची ही घटना हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील आहे.
वर्धा : मुसळधार पावसाने पूल खचला आणि आजोबा आणि नात वाहून गेली. ही घटना शनिवारी रात्री हिंगणघाट तालुक्यात चनकी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाला माहिती दिली. तत्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नात वाहून गेल्याची ही घटना हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील आहे.
कानगाव येथून बाजार करून परत चानकीला येत असताना ही घटना घडली. जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचाही शोध सुरू आहे. लाला सुखदेव सुरपाम (वय ५५ वर्ष) व नायरा साठोणे (वय ९ वर्ष) असे वाहून गेलेल्यांची नाव आहेत. सध्या पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.
शनिवारी संध्याकाळपासुन जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चानकी येथील नालाही दुभडी भरून वाहत आहे. या नाल्यावरील पूल यापूर्वीसुद्धा अतिवृष्टीने खचला होता. त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने तो पुन्हा खचला. त्यामुळे आजोबा आणि नात वाहून गेले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.