मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

By admin | Published: December 30, 2014 11:41 PM2014-12-30T23:41:01+5:302014-12-30T23:41:01+5:30

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़

Grant of sanctioned irrigation wells uncovered | मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

Next

शेतकरी हवालदिल : कर्जाचा वाढला डोंगर
वर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ तब्बल १४ शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम केले; पण अनुदान न मिळाल्याने आता शेती कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
गतवर्षी वर्धा जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून प्रत्येक ग्रा़पं़ अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या़ वडनेर येथील १४ शेतकऱ्यांना यातील विहिरी मंजूर करण्यात आल्या़ शासनाची मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम करून घेतले; पण अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही़
वडनेरच्या शेतकऱ्यांचा मंजूर असलेल्या सिंचन विहिरींमध्ये समावेश असल्याने तत्कालीन शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहीर खोदकामाचे ले-आऊट करून दिले़ यानुसार शेतकऱ्यांनी स्वत: मजूर लावून सिंचन विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे़ यानंतर शेतकऱ्यांनी सिंचन विहीर खोदकामाच्या अनुदानाची मागणी केली असता दोन महिन्यांचे अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते़ यानंतर मागील संपूर्ण कालावधी निवडणुकीचा असल्याने सध्या आचार संहिता सुरू आहे, तुमचे अनुदान देता येत नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुका होईस्तोवर प्रतीक्षा केली़ आता शेतकरी वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा मारून अनुदानाची मागणी करीत आहेत; पण शेतकऱ्यांनाच उलट उत्तरे दिली जात असल्याचे दिसते़
तुम्हाला सिंचन विहिरीचे खोदकाम कुणी करायला सांगितले, त्यांनाच अनुदान मागा, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ वडनेर येथील संपूर्ण शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ शिवाय सिंचन विहीर खोदकामाची मजुरीही शेतकऱ्यांनी कर्ज काढून दिली़ यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Grant of sanctioned irrigation wells uncovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.