आंजी परिसरात रेती व माती चोरीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:10 AM2017-10-28T01:10:38+5:302017-10-28T01:11:28+5:30
आंजी (मोठी) परिसरातील बोरगाव (सावळी), पवनूर, नरसुला इत्यादी भागातून दररोज माती व रेतीची अवैध चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : आंजी (मोठी) परिसरातील बोरगाव (सावळी), पवनूर, नरसुला इत्यादी भागातून दररोज माती व रेतीची अवैध चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. कुणाच्या वरदहस्ताने गौण खनिजांची लूट होत आहे. याचा शोध वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे.
दिवाळी संपली, वीटभट्ट्या सुरू झाल्या व घर बांधकामाला सुद्धा वेग आला आहे. त्यातच हा चोरटा व्यवसाय फोफावला आहे. गेल्या चार वर्षांपासून गौण खनिज लुटीचा हा गोरखधंदा सुरू आहे. कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठांची दिशाभूल करून गौण खनिज चोरीला प्रोत्साहन देत असल्याची परिसरात चर्चा आहे.
बोरगाव (सावळी), नरसुला, पवनूर या भागातून माती चोरीला जाण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. येथून वाहणारी धाम नदी तसेच नरसुला भागातील नारायण बुवा समाधी मंदिर परिसरातून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. मांडवा, पवनूर व बोरगाव (सावळी) रस्त्याने फेरफटका मारला असता शासनाचा महसूल बुडविणारे अनेक जड वाहने सहज निदर्शनास पडतात. गौण खनिजांची नियमबाह्य होणाºया वाहतुुकीला आळा घालण्यासाठी प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे असताना संबंधीतांकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. परिणामी, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.
महसूल व पोलीस प्रशासनाने काही वर्षांपूर्वी संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी एक विशेष चमु तयार केली होती. परंतु, सध्या ती चमु कुठे आहे आणि ती चमु काय कार्यवाही करीत आहेत हे न सुटणारे कोडेच असल्याची चर्चा परिसरातील सुजान नागरिकांमध्ये होत आहे. आंजी (मोठी) भागातून गौण खनिजांची होणारी अवैध वाहतूक थांबविण्यासाठी वन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी या भागातील सुजान नागरिकांची आहे.