गोठ्याच्या तळघरातच गावठी दारूचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:07+5:30
राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/ वायगाव (नि.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. परंतु, ही दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. याच पार्श्वभूमीवर एका दारूविक्रेत्याकडून चक्क शेतातील गोठ्यात तळघर तयार करून तेथे गावठी दारू गाळली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूसाठ्यासह एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र, होणाऱ्या या कारवाईचाही धाक दारू माफियांना नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वर्धा शहरापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या वायगाव (नि.) येथील सुमेध नगराळे (३४) याने त्याच्या रामपुरी भागातील शेतातील गोठ्यात तळ घर तयार केले. शिवाय याच तळ घरात तो गावठी दारू गाळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने छापा टाकून सुमेध नगराळे याला ताब्यात घेत गोठ्याची बारकाईने पाहणी केली असता तळघरात मोठ्या प्रमाणात कच्चा मोहरसायन सडवा आणि गावठी दारू आढळून आली.
तळघराबाबत कुणालाही संशय येऊ नये म्हणून तळघरात जाण्यासाठीच्या मार्गावर आरोपीने कापसाचे गाठोडे ठेवले होते. पोलिसांनी तळघरातून १५ ड्रम मधील कच्चा मोह रसायन सडवा तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, विकास अवचट, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, नितीन इटकरे यांनी केली.