स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरण रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:09 AM2017-07-18T01:09:28+5:302017-07-18T01:09:28+5:30
शहरातील पंचधारा मोक्षधामाचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून खितपत आहे. कुठल्याही मुलभूत सुविधा नसल्याने ..
अंत्यसंस्कारात अडचणी : चिखलातून काढावा लागतो मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील पंचधारा मोक्षधामाचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून खितपत आहे. कुठल्याही मुलभूत सुविधा नसल्याने उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत शहरातील तसेच नाचणगाव परिसरातील ग्रामस्थांना अंत्यसंस्कार आटोपावे लागतात. दोन-तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमी विकास आराखडा तयार करण्यात आला; पण जागेचा वाद निर्माण झाल्याने ते काम खितपत आहे. परिणामी, अंत्ययात्रेत जाणाऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागतात.
कडक उन्ह असो, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी असो की वादळी वारा असो या सर्वांचा मारा सहन करीत नागरिकांना अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागते. स्मशानभूमीत बसायला सावली नाही, प्यायला पाणी नाही, उन्हाळ्यात वर्धा नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी पाणी मिळत नाही. टिनाचे शेड मोडकळीस आले आहे. जळत्या सरणातून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळांमुळे नागरिकांना शेडपासून दूरच थांबावे लागते. बसायला जागा नाही. स्मशानभूमीपर्यंत येणाऱ्या रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर चिखलातून मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही. रात्री काळोखाचे साम्राज्य असते. लोकप्रतिप्रनिधींच्या उदासिन धोरणामुळे पंचधारा स्मशानभूमीची वासलातच लागली आहे.
अंत्यसंस्कारासाठी जाताना तिरडी खांद्यावर घेऊन खड्ड्यांतून मार्ग काढत ठेचाळत जावे लागते. स्मशानभूमीचा सुमारे एक किमी रस्ता चिखलाने माखला आहे. शिवाय प्रकाश व्यवस्था नसल्याने काळोखाचा सामना करावा लागतो. स्मशानात प्रेत ठेवल्यापासून समस्या पाठलाग करतात. दोन दशकांपूर्वी तत्कालीन विधान परिषद सदस्य रामदास तडस यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ओटे व टिनाचे शेड बांधले होते. ते आता कालबाह्य झाले आहे. शेडला भगदाड पडले असून ओटे खचले आहेत. पूर्वी अंत्ययात्रेत येणाऱ्यांसाठी बसायला मोठे शेड होते; पण दोन वर्षांपूर्वी सौंदर्यीकरणाच्या नावावर शेड तोडण्यात आले. परिणामी, आता येणाऱ्यांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. नावासाठी येथे अनेकदा वृक्षारोपण करण्यात आले; पण स्मशानभूमीत सावली देणारा एकही वृक्ष नाही. यामुळे वेळोवेळी करण्यात आलेल्या वृक्षारोपणावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. खा. तडस यांच्या स्थानिक विकास निधीतून हायमास्ट लावण्यात आला; पण तोही क्षीण झाल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांपूर्वी आ. रणजीत कांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक सौंदर्यीकरणाचे बांधकाम सुरू झाले; पण केंद्रीय दारूगोळा भांडार प्रशासनाने या जागेवर हक्क सांगत काम थांबविले. याबाबत खा. तडस, सैनिकी प्रशासन, जिल्हा प्रशासन व नगर प्रशासन यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या; पण तोडगा निघाला नाही. वास्तविक, दारूगोळा भांडाराच्या स्थापनेपूर्वी ही स्मशानभूमी होती. मग, दारूगोळा भांडाराची जागा कशी, हा प्रश्नच आहे. दोन वर्षांपासून खा. तडस, नगर प्रशासन व सैनिकी प्रशासनात जागेबाबत वाटाघाटी सुरू आहे; पण मार्ग निघत नाही. भाजपाचे खासदार, राज्यात व केंद्रात सत्ता आणि संरक्षण विभागही भाजपाचाच, मग, घोडे अडले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या सूचनेनुसार या जागेचे मोजमाप व चौकशी झाली. तेव्हा नदी काठचा भाग राज्य शासनाच्या मालकीचा असल्याची चर्चा होती. यामुळे ही जागा नेमकी कुणाची, दारूगोळा भांडार, राज्य शासन की अधिक कुणाची, हा प्रश्नच आहे.
पावसाळा सुरू झाला असून अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व नगर प्रशासनाने यावर तोडगा काढत सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
दारूगोळा भांडार नंतर तर स्मशानभूमी पूर्वापार
१८६५ च्या सुमारास इंग्रज काळात वर्धा नदीवर रेल्वेपूल झाला. तेव्हा या गावाला ब्रीज टाऊन, पुलाचे गाव पुलगाव हे नाव एका इंग्रज अधिकाऱ्याने दिले. १८८९ मध्ये नागपूरच्या बुटी परिवाराने कापड उद्योग सुरू केला व पुलगाव कॉटन मिल हे नाव दिले. १९०२ मध्ये नगर परिषदेची तर १९४२ मध्ये केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना झाली.