पवनारात भीषण आग; दोन कुटुंबांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:51 PM2017-12-28T23:51:17+5:302017-12-28T23:51:37+5:30
येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली. त्या मुलाने दोन्ही कुटुंबातील सदस्यांना आवाज दिल्याने ते जागे व हा प्रकार लक्षात आला. अन्यथा या आगीत कुटूंबातील सदस्यांचा होरपळून मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती, असे गावकरी सांगत आहेत.
या आगीत हेमराज हिवरे यांच्या घरातील ७० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तर उर्वरित कापूस पाण्यामुळे ओला होऊन खराब झाला आहे. इमारतीत असलेले सागवान लाकुड, शेतीसाहित्य, इमारतीचे फाटे सुद्धा जळून खाक झाले असून बºयाच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात असलेले गॅस सिलिंडर वेळीच हटविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
आगीचे वृत्त गावात पसरताच ग्रा.पं.च्या वतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. बुधवार कोरडा दिवस असल्यामुळे बºयाच जणांकडे पाण्याचा साठा नव्हता, पाणीपुरवठा कर्मचारी सुरेश उमाटे याने लगेच पुरवठा सुरू करून ती अडचणही दूर केली. ग्रा.पं.चे सरपंच अजय गांडोळे, पं.स.सदस्य प्रमोद लाडे, माजी ग्रा. पं. सदस्य नितीन कवाडे हे आग विझेपर्यंत परिसरात ठाण मांडून बसले होते. पोलीस प्रशासनाच्यावतीने पांडे आपल्या चमुसह दाखल झाले. सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. परंतु एवढ्या पहाटे कारण नसताना आग कशी लागली हे मात्र कोडेच आहे.
आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. योगेश तिमांडे, किरण गोमासे, अमोल भूत, मुकूंद करमकर, अनिल तिमांडे, उमेश हजारे, सचिन कराडे, किरण गुल्हाने, सुधाकर येरुणकर, रूपेश ठाकुर, दिनेश उराडे, दिलीप रोशन रघाटाटे, बंटी पठाण, किरण हिवरे, रोमहर्ष हिवरे, अनिकेत हिवरे, हर्षल हिवरे, सुरज कळमकर, प्रज्वल हजारे, गजानन हिवरे व इतर गावातील युवकांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शाब्बास रे पठ्ठे
हिवरे यांच्या शेजारी राहणारा तेजस मुकुंद करमरकर हा १५ वर्षाचा दहावीत शिकणारा मुलगा शिकवणीला जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता उठला असता त्याला शेजारील घरातून धूर बाहेर येताना दिसला. त्याने आरडा-ओरड करून सर्वप्रथम हिवरे कुटुंबियांना जागे करून आगीची सुचना दिली. साखर झोपेत असणाऱ्या हिवरे कुटुंबियांना आग लागल्याची खबर नव्हती. तेजसमुळे दोन्ही हिवरे कुटुंबियांचे प्राण बचावले.
युवाशक्तीचे अतुलनीय कार्य
आग लागून रौद्ररुप धारण करीत असल्याचे दिसताच गावातील युवाशक्तीने आपल्या अतुल शौर्याचा पराक्रम दाखवित आजुबाजूच्या विहिरीवरील मोटर पंप सुरू करुन आग पसरु न देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सोबतच त्यांना महिलावर्गांनी साथ देत आग विझविली. फायर ब्रिगेडसोबत संपर्क साधण्यात बराच वेळ लागला, तोपर्यंत युवाशक्ती व महिलावर्गाने आग बºयाच प्रमाणात आटोक्यात आणून तिला पसरण्यास बचाव केला. नाहीतर या आगीच्या विळख्यात बरीच घरे येऊन मोठी दुर्घटना घडली असती.
बैलजोडी वाचली
सुधाकर येरुणकर व दिनेश उराडे यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याचे कुलूप तोडून आगीतून बैलजोडीला बाहेर काढल्यामुळे बैलजोडी वाचली .
घरी नसल्यामुळे प्राण वाचले
दौलतराव हिवरे सपत्नीक बाहेर गावी गेले असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांचे जळालेले घर बघून त्यांना बाहेर निघणे कठीण झाले असते.
आगीत झालेले नुकसान
या आगीत हेमराज हिवरे यांचा ४० क्विंटल कापूस, २ गव्हाचे पोते, २ ढेपीचे पोते, ४५ सागवान मयाली, स्प्रिकंलर पाईप, २ फवारणी यंत्र, शेतीसाहित्य व इमारतीच्या मयाली असे अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले.
दौलतराव हिवरे यांच्या घरात असलेली ४० ते ४५ हजार रुपयांची रोकड, साखर, तांदुळ, दाळ, गहू, तेलाचे तीन पीपे व घराचे साहित्य असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.