आदिवासींचे महान कार्य दडपलेच
By Admin | Published: July 5, 2017 12:27 AM2017-07-05T00:27:49+5:302017-07-05T00:27:49+5:30
स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली.
प्रदीप सुभेदार : द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली. सर्व प्रथम इंग्रजाचा विरोध करुन त्यांच्या विरुद्ध विद्रोह करणारा तिल्का मांझी होता; पण मांझी नंतर ३० वर्षानंतर विरोध करणारे मंगल पांडे हे प्रथम सेनानी ठरले. हा अन्याय आजही आदिवासींवर होत आहे. आदिवासी समाज हा संस्कृती जतन करणारा असून त्यांचे महान कार्य हेतूपुरस्सर जगापुढे येवू दिले गेले नाही. ते वेळोवेळी दडपण्यात आले, असे प्रतिपादन आदिवासी विचारवंत प्रदीप सुभेदार यांनी केले.
स्थानिक डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ‘अनुसूचित जाती व जमातीच्या मानवी अधिकाराचे हनन हा परिषदेचा विषय होता. व्यासपीठावर डॉ. आर. एस. मरकाम, बिलासपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धानसिंग धुर्वे, डॉ. व्यंकटेश वादित्य, संजय रामराजे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. केशव पाटील, डॉ. चेतना सवाई उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना धुर्वे यांनी शासनाचे आदिवासीप्रति असलेले उदासीन धोरण आदिवासींच्या विकासाला बाधक ठरत असल्याची टिका केली. भारतात केवळ ३ टक्के शिक्षणावर खर्च होतो. अमेरिकेसारख्या देशात हा खर्च भारतापेक्षा दहापट आहे. आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. चेतना सवाई, डॉ. मरकाम यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुधीर जिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंदप्रकाश भेले यांनी केले तर आभार प्रा. दीपक मगरंदे यांनी मानले.