१५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्पाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:15 AM2019-02-28T00:15:59+5:302019-02-28T00:17:20+5:30

स्थानिक न.प.चा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ‘ना नफा ना तोटा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन १५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्याला सभागृहाने मंजूरीही दिली आहे.

Green flagrant budget for 150.69 crores | १५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्पाला हिरवी झेंडी

१५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्पाला हिरवी झेंडी

Next
ठळक मुद्दे‘ना नफा ना तोटा’ चा उद्देश ठेवला वर्धा नगरपालिकेने केंद्रस्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक न.प.चा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ‘ना नफा ना तोटा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन १५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्याला सभागृहाने मंजूरीही दिली आहे. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, न. प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सभागृहात नगरसेवक, नगरसेविका, न.प.च्या विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अर्थसंकल्पाचे वाचन न.प.चे लेखापाल अशोक वाघ यांनी केले.

ठळक नवीन भांडवली उपक्रम
सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नवीन प्रशासकीय इमारत उर्वरित कामांसाठी ५ कोटी, प्रभागांमधील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ५ कोटी, टिळक व्यापारी संकुलासाठी ७ कोटी, विविध उद्याने, चौक, दुभाजकांचे सौंदर्यीकरण, फेरीवाले क्षेत्रांच्या विकासासाठी ४ कोटी, इंदिरा गांधी उद्यान व इतर उद्यानांचे हरित क्षेत्र म्हणूण विकास करण्यासाठी १ कोटी, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना राबविण्यासाठी ३.५० कोटी, प्रभागांमधील विद्युतीकरण आणि मुख्य रस्ते विद्युतीकरणासाठी २.८४ कोटी, जलमापक यंत्रांसाठी ६ कोटी, अमृत वाढीव पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी ६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेच्या स्थापनेला होत आहेत १४५ वर्ष पूर्ण
वर्धा न.प.ला ‘अ’ दर्जा प्राप्त असून न.प.ची स्थापना १८७४ ला झाली. या न.प.ला यंदा १४५ वर्ष पूर्ण होत असून सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये पार पडली होती. सध्या न.प.ची वाटचाल स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेच्या दिशेने सुरू आहे.

कल्याणकारी उपक्रम
बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कल्याणकारी उपक्रमात मोडणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी ४ कोटी, रमाई आवास योजनेसाठी २.९७ कोटी, दिव्यांग कल्याण कार्यक्रमासाठी २० लाख, महिला व बालकल्याणच्या कार्यक्रमासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

देखभाल व दुरूस्तीसाठी ३३ कोटी ५० लाख
या अर्थसंकल्पात ३३ कोटी ५० लाखांचा निधी न.प.च्या विविध विभागातील कामांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यात पाणी पुरवठा विभागाच्या वाट्याला ५ कोटी, विद्युत विभागासाठी १.५० कोटी, बांधकाम विभागासाठी ३ कोटी, आरोग्य विभागासाठी ५ कोटी तर आस्थापनासाठी १९ कोटी आल्याचे सांगण्यात आले.

ही कामे होणार युद्धपातळीवर पूर्ण
शहरातील विविध उद्यानांच्या विकासासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली असून हे काम सन २०१९-२० मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय ४ कोटी खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास, १.३० कोटींच्या निधीतून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानाची कामे, ४ कोटीतून अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेद्वारे विविध कामे, १.५० कोटी खर्च करून स्मशानभूमीचा विकास, १० कोटींच्या निधीतून न.प.ची प्रशासकीय इमारत व ४.४० कोटीतून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

Web Title: Green flagrant budget for 150.69 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.