महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:11 PM2018-04-14T22:11:28+5:302018-04-14T22:11:28+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हील लाईन भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेकांनी शनिवारी माल्यार्पण करीत अभिवादन केले. सकाळपासूनच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हील लाईन भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेकांनी शनिवारी माल्यार्पण करीत अभिवादन केले. सकाळपासूनच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त सिव्हील लाईन भागातील महामानवाचा पुतळा सजविण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना प्राथमिक सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून नियोजनबद्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. सिव्हील लाईन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध साहित्य, प्रतिमा, फोटो इतकेच नव्हे तर भगवान गौतम बुद्ध यांचे फोटो, प्रतिमा आदी विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. डॉ. आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असलेल्या तरुण-तरुणी, महिला-पुरुष व चिमुकल्यांसह वयोवृद्धांनी तथा विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी शनिवारी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. ११.३० वाजताच्या सुमारास शिवसेनेचे वर्धा-हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
सकाळी काही युवक, संघटनांनी शहरातून दुचाकी रॅलीही काढली होती. शहरातही भीमसैनिकांकरिता अनेक ठिकाणी अल्पोपहार, पाणी, शीतपेय आदींचे स्टॉल लावले होते. दिवसभर बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अनेकांनी अभिवादन केले.
जिल्हाधिकाऱ्यांची बाबासाहेबांना आदरांजली
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हारार्पण करुन पोलीस बँड पथकाच्या गजरात मानवंदना दिली. सकाळी ८ वाजताच जिल्हाधिकारी नवाल हे डॉ. आंबेडकर चौकात उपस्थित झाले होते. यावेळी पोलीस बँड पथकही सज्ज होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाचे उपसंचालक सुरेंद्र पवार उपस्थित होते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरी केली. यात प्रत्येक दिवशी करण्यात येणाºया उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
गरजूंना पुस्तके मिळावी म्हणून सरसावले अनेक हात
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेडकर स्टुडंट असो.द्वारे नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेत त्याची अंमलबजावणी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून आंबेडकर स्टुडंट असो.च्या स्वयंसेवकांनी अनेक दानदात्यांकडून त्यांच्या घरात पडून असलेली व विविध विषयांची माहिती देणारी पुस्तके स्वीकारली. ही पुस्तके गरजूंना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
आपूलकी सामाजिक संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मैदानावर नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा आंबेडकरी अनुयायांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला. याप्रसंगी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.