पोलीस मुख्यालयात शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:00 AM2018-10-22T00:00:40+5:302018-10-22T00:01:43+5:30
पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. तेली व अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
रविवार २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. सन १९५९ मध्ये याच दिवशी लदाख मधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादीत व निर्मनुष्य अशा आॅटस्प्रिंग येथे पोलीस दलातील काही जवान गस्त घालत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. यात भारतीय पोलीस जवानांनी कडवे आवाहन देत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी झुंज दिली. यात अनेक सैनिकांना वीरमरण आले. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दुखाची छाया पसरली होती. या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी आणि कर्तव्याची तसेच राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृती पित्यर्थ २१ आॅक्टोबरला हा दिवस देशात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी संपूर्ण देशभरातून एकूण ४१९ पोलीस अधीकारी व पोलीस जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण तीन पोलीस जवानांचा समावेश आहे. पोलीस अधिकारी व जवान यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना जीवाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली त्या शहीदांना स्थानिक पोलीस मुख्यालयात आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वीर मरण आलेल्या शहीदांचे कुटुंबियांची उपस्थिती होती.