लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:01 PM2020-07-16T12:01:00+5:302020-07-16T12:27:33+5:30

नवरदेवावर सेवाग्राम पोलीस ठाण्यात सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या तक्रारीवरून पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Groom in Wardha district re-charged for filming Kovid Ward | लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल

लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देरुग्णालयात चित्रिकरण करणे भोवलेयापूर्वी रामनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून झाला होता दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्या प्रकरणी पिपरी (मेघे) येथील नवरदेवावर सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यात गटविकास अधिकारी स्वाती ईसाये यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आल्याचा विषय ताजा असतानाच मंगळवारी रात्री उशीरा याच नवरदेवावर सेवाग्राम पोलीस ठाण्यात सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या तक्रारीवरून पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पिपरीचा नवरदेव, त्याची पत्नी, आई, मामे भाऊ आणि बहिण यांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सध्या कोविड केअर युनिट मध्ये ठेवण्यात आले आहे.

लग्न सोहळ्यासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची उपस्थिती क्रमप्राप्त असताना पिपरी (मेघे) येथील रहिवासी असेल्या नवरदेवाने त्याच्या लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याचे निदर्शनास आल्यावर गटविकास अधिकारी स्वाती इसाये यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तर कुठलीही परवानगी न घेता कंदुरीचा कार्यक्रम केल्याचे लक्षात येताच नवरदेवावर २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पिपरीच्या नवरदेवावर झालेल्या या दोन्ही कारवाई ताज्या असताना मंगळवारी रात्री उशीरा डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. नवरदेवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या रुग्णालयात उपचार घेत असताना पिपरीच्या नवरदेवाने रुग्णालयातील कोविड वॉर्डाचे चित्रिकरण करून ती चित्रफित व्हायरल करून रुग्णालयाची बदनामी केली. चित्रफित तयार करणे हे रुग्णालयाच्या नियमांना बगल देणारे असून नागरिकांमध्ये रुग्णालयाबाबत गैरसमज पसरविला आहे. विशेष म्हणजे पिपरीचा नवरदेव कोरोना बाधित असताना तो कुठलीही सावधगीरी न बाळगता प्रतिबंधीत क्षेत्रातही मुक्त संचार करीत होता. त्याच्या या कृत्यामुळे कोविड वॉर्डातील बालकालाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका बळावत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकल्यावर पिपरीचा नवरदेव हा माझी उच्च स्थरावर ओळख आहे, शिवाय त्याचा वापर करून संस्थेची बदनामी तसेच संस्थेला मोठी हाणी पोहोचविण्याची नेहमी धमकी देत असल्याचे डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आरोपी नवरदेवावर भादंविच्या कलम २६९, सहकलम ३ साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१, ५२ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

शेवटपर्यंत केले नाही सहकार्य
क्रिडा शिक्षक असलेल्या पिपरी येथील कोविड बाधित नवरदेवाने लग्नात किती व्यक्ती आले होते, कंदुरी आणि हळदीला किती लोक उपस्थित होते याची माहितीच लपविण्यात धन्यता मानली. इतकेच नव्हे तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशीही वेळोवेळी वाद घातला. एकूणच कोविड बाधित या नवरदेवाने शेवटपर्यंत कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title: Groom in Wardha district re-charged for filming Kovid Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.