भूजल साठ्यात ०.५८ मीटरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:12 PM2018-04-26T22:12:59+5:302018-04-26T22:12:59+5:30
उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे.
प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे. असे असले तरी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत भूजल साठ्यात सरासरी ०.५८ मिटरची घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण केलेल्या ११२ विहिरींची सरासरी पाणी पातळी ७.६० मिटरपर्यंत खालावल्याचे सांगण्यात आले.
यंदा एप्रिल महिन्यातच पारा ४४ अंशाला टेकला होता. शिवाय सातत्याने ४३ ते ४४ अंश सेल्सीअस दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. यामुळे यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवेल, असा प्रशासनासह सर्वांचा अंदाज होता. यासाठीच पाणीटंचाईच्या उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी त्या तुलनेत घटली नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या कार्यालयाद्वारे आर्वी तालुक्यातील १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात मागील पाच वर्षांत जलपातळी ५.८६ मीटर तर यंदा मार्चपर्यंत ६.५० मीटर म्हणजे ०.६४ मीटर घट नोंदविली आहे. आष्टी तालुक्यातील ८ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ९.०२ वर असलेली पातळी ९.४४ वर जात ०.४२ मीटरने घटली. कारंजा तालुक्यात १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात पाच वर्षांतील ६.८५ वरील पातळी ७.२५ वर गेली असून ०.४० मिटरने घटली. वर्धा तालुक्यातील १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात पाच वर्षांत ८ वर असलेली जलपातळी ८.५८ वर म्हणजे ०.५८ मिटर घटल्याचे नमूमद आहे. देवळी तालुक्यातील ११ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. यात पाच वर्षांत ५.९४ मीटरची असलेली नोंद ६.७६ वर जात ०.८२ मीटर घटली आहे. सेलू तालुक्यातील २० विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ७.२७ वर असलेली पातळी ७.८२ वर गेली. यात ०.५५ मीटर घट झाली. हिंगणघाट तालुक्यातील २४ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ६.७२ मिटर असलेली पातळी ०.७२ मिटर घटून ७.४४ वर गेली. समुद्रपूर तालुक्यातील १३ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांतील ६.५५ मीटरवरून ०.४७ मीटरने घटून ७.०२ मीटरवर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ११२ विहिरींची मागील पाच वर्षांची सरासरी ७.०३ मीटरवरून ०.५८ मीटरने घटून ७.६० मीटरवर पोहोचली आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांमुळे भूजल पातळीमध्ये यंदा अपेक्षेपेक्षा कमी घट आल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले. पर्जन्यमानातील १८.८४ टक्क्यांच्या घटीनंतरही जिल्ह्यातील भूजल पातळी फारशी खालावली नसल्याने भिषण पाणीटंचाईचे सावट नाही.
जलयुक्त शिवार व वॉटर कपमुळे पातळी टिकून
वर्धा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आलीत. यात नाला खोलीकरण, सरळीकरण, सिमेंट बंधारे, गावतलाव, तलावांचे खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे. यामुळे भूजल पातळी राखण्यास मोलाची मदत झाल्याचे सांगण्यात आाले आहे. वास्तविक, मागील वर्षी पावसाची तूट असल्याने यंदा भूजल पातळीत मोठी घट अपेक्षित होती; पण तसे झाले नाही. केवळ ०.५८ मीटरने जलपातळी खालावली आहे. यामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाईचे चिन्ह नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
पर्जन्यमानात १८९.२३ मिमीची घट
जिल्ह्यात सरासरी १००४.१९ मिलीमीटर पावसाची नोंद अपेक्षित असते; पण मागील वर्षी ८१४.९६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सरासरीपेक्षा जिल्ह्यात १८९.२३ मिलीमिटर पाऊस कमी झाला आहे. एकूण पावसामध्ये १८.८४ टक्के घट आल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवेल, अशी अपेक्षा होती; पण शासन, खासगी संस्था तथा ग्रामस्थांकडून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विशेष पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे जीएसडीएने सांगितले. त्यांनी केलेल्या ११२ विहिरींच्या निरीक्षणात केवळ देवळी व हिंगणघाट तालुक्यात भूजल पातळी अधिक खालावली. यामुळे धोक्याचे संकेत आहेत.