कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:46 PM2019-06-19T22:46:20+5:302019-06-19T22:46:40+5:30
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.
विजय चौधरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.
तालुक्यात २०१५-१६ या वर्षांत जलयुक्त शिवारअंतर्गत ५२ गावांमध्ये कामांना प्रारंभ झाला. या गावांमध्ये नाला खोलीकरण, ढाळीचे काम, धुऱ्यावर बंधारा, शेततळे, सिमेंट नालाबांध अशी ४५० कामे करण्यात आलीत.
२०१६-१७ या वर्षांत १८ गावांत जलयुक्त शिवार योजनेची ११० कामे मंजूर होती. त्यापैकी १०६ कामे झाली. उर्वरित ४ कामांपैकी नागाझरी येथील नाला खोलीकरण रद्द करण्यात आले तर ३ कामे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आलीत. या वर्षात नाला खोलीकरणाची ८६ कामे, ढाळीचे काम १९ तर १ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. २०१७-१८ या वर्षात १८ गावांत ६७ कामे करण्यात आलीत. यात ६ ढाळीचे बांध, ५४ नाला खोलीकरण व ७ जुने सिमेंट नाला बांध ही कामे करण्यात आली. या सर्व कामांवर १ कोटी २३ लाख ३ हजार ४७ रुपये खर्च करण्यात आला. २०१८-१९ या चालू वर्षात २१ गावांमध्ये एकूण ७३ कामे मंजूर असून यापैकी ६ कामे रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षीच्या कामात ६२ कामे नाला खोलीकरण ११ ढाळीचे बांध आहेत. रद्द झालेल्या ६ कामांपैकी ३ शेतकऱ्यांनी नकार दिला असून ३ ठिकाणी भूजल सर्वेक्षणाची कामे सुरू असल्यामुळे कृषी विभागाला ती कामे करता आली नाहीत. या वर्षीच्या कामावर एकूण खर्च १ कोटी २१ लाख ४४ हजार ६६८ मंजूर आहेत.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक कामे या तालुक्यात करण्यात आली. काही शेतकºयांनी कामाविषयी तक्रारीसुद्धा केल्या असल्याचे समजते. कारण फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल, अशी भिती शेतकऱ्यांना होती. कृषी विभागाद्वारे तक्रारीची चौकशी सुद्धा करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवालही सादर करण्यात आला.मागील चार वर्षांपासून ही कामे सुरू असून एकच गाव पुन्हा या योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले नाही. बऱ्याच ठिकाणी नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध ही कामे पाण्याच्या प्रवाहाने फुटली. काही ठिकाणी गाळदेखील साचलेला आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा जो चांगला उद्देश होता तोच मुळात साध्य झाला नाही. पावसाळ्यात काही दिवस पाणी असते, नंतर हे बांध कोरडे पडलेले असतात.
जलयुक्तच्या कामांमुळे अनेक शेतकºयांना झाला फायदा
याबाबत तालुका कृषी अधिकारी विजय महंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. याशिवाय मागील ३ वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेद्वारे ११४ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेत. या योजनेत १७ हजारांपासून ५० हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी मंजूर झाला. मागील वर्षी ७० टक्के पाऊस पडला. १४ सप्टेंबर २०१८ पासून पाऊस बंद झाला. तरीही आलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने मार्च, एप्रिलपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना व बोअरवेलला फायदा झाला.