वन्यप्राण्यांनी भुईमूग केले भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:24 PM2019-06-04T22:24:08+5:302019-06-04T22:26:12+5:30
शेतमालाकरिता वन्यप्राणी कर्दनकाळच ठरत असल्याचे चिकणी व परिसरातील शेतशिवारात दिसून येते. शेतातील कोणतेही पीक वन्यप्राणी पिकांना फस्त केल्याशिवाय राहात नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी चिकणी व परिसरातील शेतकरी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : शेतमालाकरिता वन्यप्राणी कर्दनकाळच ठरत असल्याचे चिकणी व परिसरातील शेतशिवारात दिसून येते. शेतातील कोणतेही पीक वन्यप्राणी पिकांना फस्त केल्याशिवाय राहात नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी चिकणी व परिसरातील शेतकरी करीत आहेत.
येथील श्ेतकरी किसना डायरे यांचे निमगाव (सबाने) पांदण रस्त्यालगत चिकणी शिवारात पावणे चार एकर ओलिताखालील शेती आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी एक एकर शेतात ४० किलो भुईमूग (शेंगदाणा) ची पेरणी केली होती. याकरिता त्यांना ५ हजार रुपयांच्या बियाण्यांसह १८ हजार रुपये खर्च आला. खत, निंदन, फवारणी, पाणी, मशागत आदींचे चोख व्यवस्थापन केल्याने व योग्य निगा राखल्याने भुईमुगाचे पीक चांगलेच बहरून आले होते. परंतु भुईमुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला व बहरलेले पीक आतून पोखरून टाकले. वन्यप्राण्यांमध्ये प्रामुख्याने वराह, सारस, रोही, माकड आदींचा समावेश आहे. सारस व वराह हे दोन्ही प्राणी जमीन उखरून आतील भरलेल्या भुईमुंगाच्या शेंगा फस्त करीत असे. तर माकड व रोही झाडे उपटून खायचे. यामुळे लागलेला खर्च तर सोडा पेरलेल्या बियाण्याइतकेसुद्धा शेंगदाणे झाले नाहीत.
४० किलो शेंगदाणे पेरले आणि उत्पन्न झाले. ३० किलो उरले ते केवळ कुटारच. यामुळे शेतकरी डायरे यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसला आहेत. करीता शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डायरे यांनी केली आहे.
तापमानात कमालीची वाढ झाली असूनसुद्धा शेतातील विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे भाजीपालावर्गीय पीक घ्यायची हिंमतच होत नाही.
- किसना डायरे, शेतकरी, चिकणी.