विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:59 PM2019-03-04T21:59:26+5:302019-03-04T21:59:54+5:30
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील खुबगाव, वाठोडा, दहेगाव, पाचेगाव, गुमगांव, वाढोणा, पिंपळखुटा, चांदणी, रोहणा, वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, शिरपूर (बोके) आदी गावातील विहिरींनी मार्च महिन्याच्याच सुरूवातीला तळ गाठल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पुढील दिवसांमध्ये हे जलसंकट भीषण रुप धारण करेल असा कयास बांधल्या जात आहे. तालुक्यातील बहूतांश नद्या कोरड्या पडल्या आहेत. शिवाय ज्या नदी पात्रात नाममात्र पाणीसाठा आहे तो पुढील तीन महिने टिकणार नसल्याने आताच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय, सध्या शेतकऱ्यांसह पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, पशुसंवर्धन विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह पशुपालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींना मुबलक पाणी असते तर चारा समस्येवर शेतकऱ्यांच्या सहकार्यने मात करता आली असती. परंतु, विहिरींनी तळ गाठल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जंगलातही पाणी नसल्याने आणि वनविभागानेही कृत्रिम पाणवठे व्यवस्थित करीत त्यात पाणी न भरल्याने वन्यप्राणीही उन्हाळ्यात गावांकडे धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महिलांना करावी लागतेय भटकंती
आर्वी शहरातील शिरपूर रोड, एल.आय.जी. कॉलनीच्या मागील भागातील वसाहतीत नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही उपाययोजना तेथील लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत आहे. हीच परिस्थिती शहरातील आणखी काही भागात आहे. काही नागरिकांनी याची माहिती लोकप्रतिनिधींना देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली.