१८ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई
By admin | Published: January 9, 2017 01:39 AM2017-01-09T01:39:52+5:302017-01-09T01:39:52+5:30
नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी
खासगी टँकरने पाणीपुरवठा : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आर्वी : नेरी-मिर्झापूर येथील ६५० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित वसाहतीमध्ये गत १८ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी चिंता व्यक्त करतात. येथील विहिरींना पाणी नाही तर कुपनलिका नादुरुस्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येणाऱ्या उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याकरिता चांगलीच भटकंती करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. ही भीषण परिस्थिती लक्षात घेता यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त केली जात आहे.
येथील पाणीटंचाईच्या समस्येबाबत शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना अवगत करुन देण्यात आले आहे. वारंवार विनंती करूनही अद्याप पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आज येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नेरी-मिर्झापूर गावाची लोकसंख्या ६५० असून या पुनर्वसनात तीन विहिरी आहे. या विहिरींना आताच पाणी नाही. त्याप्रमाणे या पुनर्वसनात सहा कुपनलिका आहे. त्यापैकी चार नादुरुस्त असून त्यातील केवळ दोनच कुपनलिका सुरू आहे. आता या कुपनलिकांना पाणी येत नाही. या पुनर्वसित गावातील समस्यांचे संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची सुविधा प्रदान करण्यात आली नाही. मागण्यांची पुर्ती केली जात नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. गावातील कोणताही व्यक्ती मृत पावला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४ कि.मी अंतर चालत जवे लागते. गावाला स्मशानभुमी दिली नाही. अनेक घरात अजुनही वीज जोडणी नाही. पक्के रस्ते नसून नाल्या बांधलेल्या नाही. गावाचे पुनर्वसन करताना केलेले रस्ते आता निरुपयोगी ठरत आहे.
येथील परीस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नेरी-मिर्झापूरचे उपसरपंच बाळासाहेब सोनटक्के यांनी निवेदनातून दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना सादर करण्यात आले.(तालुका/शहर प्रतिनिधी)
नेरी-मिर्झापूर पुनर्वसन वसाहतीतील प्रकार
४येथील एका कुपनलिकेतून नळयोजनेला पाणी पुरवठा होत होता. परंतु जलस्तर कमी झाल्याने कुपनलिका आटली आहे. शिवाय काही कुपनलिका नादुरुस्त आहे. येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे.
४१४ दिवसांपूर्वी येथे एक कुपनलिका खोदण्यात आली. परंतु त्याला अत्यल्प पाणी लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऐन हिवाळ्यात येथे टँकरने पाणीपुरवठा होत असून उन्हाळ्यात येथील पाणीटंचाई उग्ररुप धारण करणार असल्याचे दिसते.