आशासह गटप्रवर्तकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:37 PM2019-06-19T22:37:56+5:302019-06-19T22:38:48+5:30
आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर आयटकच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तकांनी धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर आयटकच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व दिलीप उटाणे यांनी केले.
मंत्रालयीन बैठकीत ठरल्यानुसार आशा यांना ५ हजार रुपये व गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये प्रतिमहा मानधन तातडीने लागू करण्यात यावे, आशा व गटप्रवर्तक यांना दिलेले आश्वासनानुसार दिवाळीचा बोनस म्हणून मानधनाएवढी रक्कम देण्यात यावी, आशा व गटप्रवर्तक यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासन, जि.पं. सेवेत रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे, आशा व गटप्रवर्तक यांना इतर विभागाचे कामे देण्यात येऊ नये, यवतमाळ औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आशांना १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रमाणे वेतन मिळण्यााठी पाठपुरावा करण्यात यावा., तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ आशा व गटप्रवर्तक यांना केंद्र सरकार प्रतिदिन ३५० रुपये वेतन व गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रॉव्हिडंट फंड आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली असून याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनानुसार एनएचएमकडून दुचाकी देणे, आशांना सायकल देणे याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. सदर आंदोलनात सुजाता भगत, सिंधू खडसे, प्रतिभा वाघमारे, वैशाली नंदरे, प्रमिला वानखडे, वीणा पाटील, ज्योती वाघमारे, योगिता डहाके, शबाना शेख, ज्योत्स्ना भुयारी, रेखा तेलतुंबडे, प्रतिभा जाधव, ज्योत्स्ना मुंजेवार, शुभांगी खेकाळे, संगीता निमजे, अपर्णा आटे, शीतल लभाने, अरुणा खैरकार, प्रमोदिनी भगत, अलका पुरी, अर्चना मून, सविता वाघ, विभा आगलावे, माधुरी गलांडे, नंदा महाकाळकर, संगीता निमजे, संगीता मलमे, वीणा पाटील, उज्ज्वला थूल, शितल शेगेकर, संध्या टेंगरे व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
थाळी वाजवून नोंदविला निषेध
आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी कर्मचारी विरोधी धोरण राबविणाºया सरकारचा थाळी वाजवून निषेध नोंदविला. शिवाय सरकारने दिलेल्या विविध आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणीही रेटली. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.