गट सचिवांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:28 PM2018-06-08T22:28:25+5:302018-06-08T22:28:25+5:30
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३४१ संस्थांमधील ८२ गटसचिव गेल्या तीन वर्षांपासून विना वेतन आहेत. या गट सचिवांचे वेतनाचे ३ कोटी ५२ लाख ९४ हजार ३०८ रुपये व जॉर्इंड फंड वर्गणीचे ४८ लाख ८१ हजार ६५१ रुपये अदा करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाळटाळ करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३४१ संस्थांमधील ८२ गटसचिव गेल्या तीन वर्षांपासून विना वेतन आहेत. या गट सचिवांचे वेतनाचे ३ कोटी ५२ लाख ९४ हजार ३०८ रुपये व जॉर्इंड फंड वर्गणीचे ४८ लाख ८१ हजार ६५१ रुपये अदा करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाळटाळ करीत आहे. त्यामुळे ८२ सचिवांचे कुटुंबियांची आर्थिक कुचंबना होत आहे. या समस्या निकाली काढण्यासाठी अखेर जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सदर आंदोलनादरम्यान गट सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर आंदोलन महेंद्र गोपीसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. निवेदन देताना अनिल लोखंडे, सुरेंद्र साळुंक, दीपक विहरे, एन.पी. येंडे, जी.एम. डहाके, एम. बी. मोहिते, जी. के. तराशे, जी. डी. मेहरे, एम. एम. राऊत आदी उपस्थित होते. गटसचिवांचे तीन वर्षांचे वेतन तसेच टीएडीएचे देयक गत सहा वर्षांपासून देण्यात आले नाही. ८२ गटसचिवांची डिसेंबर २०१७ पर्यंतच्या वेतनापोटी ३ कोटी ५२ लाख ९४ हजार इतकी रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे थकीत असून ते देण्याची मागणी आहे.