रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:42 AM2017-09-23T00:42:41+5:302017-09-23T00:42:57+5:30
जीएसटीच्या निर्णयाने अडचणीत आलेल्या कंत्राटदारांनी यावर्षी बांधकामाच्या निविदा न भरण्याचा पवित्रा घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी(श.) : जीएसटीच्या निर्णयाने अडचणीत आलेल्या कंत्राटदारांनी यावर्षी बांधकामाच्या निविदा न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिपाक म्हणून महिनाभरात दोनदा निविदा निघाल्यावरही कंत्राटदारांनी यात रस दाखविला नाही. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीचे काम रेंगाळले आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून अपघाताच्या घटनाही घडत आहे. काही गावात तर परिवहन मंडळाच्या बसफेºया देखील बंद केल्या. हा वाद संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने खड्ड्यांच्या डागडुजीचा प्रश्न अनुत्तरीत आहे.
तालुक्यातील गावाकडे जाणारे रस्ते पावसामुळे खड्डेमय झाले आहे. याची डागडुजी कधी करणार अशी विचारणा अधिकाºयांना नगरिक करतात. खड्डे दुरुस्तीकरिता होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रवाशातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. शासन अटींवर अडून असल्याने कंत्राटदार आणि शासन यांच्या एकमत झाल्याशिवाय ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे बोलले जाते.
तुकडे पाडून स्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम जवळपास बंद झाला आहे. आता सलग रस्त्याचे काम दोषदायित्व कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची राहणार आहे. शिवाय वस्तू व सेवा कर १८ टक्क्यांवर पोहचल्याने त्याची कपात सक्तीची केली. अंदाजपत्रकात मात्र याची कुठेही तरतुद नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी संप केला. आष्टी (श.) तालुक्यात १ कोटी ५१ लक्ष रूपयांच्या संयुक्त निविदा दोनदा प्रकाशित झाल्या. आता सार्वजनिक बांधकाम विभाग तिसºयांदा निविदा प्रकाशित करणार असल्याची माहिती आहे. तालुक्याला तीन जिल्ह्याच्या सीमा प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांची रस्त्याने मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डे कसे आणि कधी बुजवितात, अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे.