मुलाला रोजगार मिळवून देण्याची हमी
By admin | Published: October 11, 2015 12:21 AM2015-10-11T00:21:54+5:302015-10-11T00:21:54+5:30
येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घराकडे कोणीही फिरकले नाही.
खासदारांसह वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष शेतकऱ्याच्या घरी
वायगाव (निपाणी) : येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घराकडे कोणीही फिरकले नाही. त्यांच्या परिवारावर आलेले विदाराक वास्तव ‘लोकमत’ने उजेडात आणले. यानंतर कागदी घोडे नाचविणाऱ्या शासकीय यंत्रणेसह नेत्यांची वाहने या शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे वळू लागली आहेत. शनिवारी खासदार रामदास तडस व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी झोटींग कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खा. तडस यांनी परिवारातील सदस्यांशी चर्चा करून मुलाला रोजगार देण्याचा शब्द दिला.
यावेळी तिवारी व खा. तडस यांनी झोटींग यांच्या घराची पाहणी केली. खासदार तडस यांनी लगेच तात्पूरती आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी मक्त्याने केलेल्या शेतजमीने करारपत्र पाहिले.
या कागदावरून शेतकऱ्याला शासकीय मदत देणे शक्य असल्याचे किशोर तिवारी यांनी तहसीलदार यांना सांगितले. शिवाय या शेतकऱ्याला मदत मिळेल, या दृष्टीने कार्य करण्याच्या सूचना तहसीलदार राहुल सारंग यांना यावेळी दिल्या.
तसेच मुलाला रोजगारासह पंतप्रधान कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली. यावेळी जि.प. सदस्य मिना वाळके, सरपंच गणेश वादाळे, वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग, कृषी अधिकारी बिपीन राठोड, प्रशांत इंगळे तिगावकर, गुड्डू कावळे, सुनील तळवेकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी सकाळी वर्धेतील काही अज्ञात युवकानी नाव न सांगता या कुटुंबांना २ हजार रुपयांची मदत केली.(वार्ताहर)