सर्वांगिण विकासासाठी शिवसेना स्वीकारणार सात गावांचे पालकत्व
By admin | Published: September 21, 2015 02:03 AM2015-09-21T02:03:53+5:302015-09-21T02:03:53+5:30
ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात.
पत्रपरिषद : शासकीय योजना कार्यान्वित करणार
कारंजा (घा.) : ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात. मात्र या योजना कार्यान्वित होत नसल्याने त्या गरजूपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भाग आजही विकासापासून दूर असल्याचे चित्र पहायला मिळते. तालुक्यातील सात गावांचे पालकत्व घेऊन या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख यांनी दिली.
कारंजा तालुक्यातील वाघोडा, सेलगाव (उमाटे), धामकुंड, जुनापाणी भालेवाडी, येनगाव, पिपरी या गावांचे पालकत्व स्विकारणार असून येथे शासकीय योजना कार्यान्वित करीत या योजनांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
गावाच्या विकासाकरिता लागणारा निधीची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. या सात सर्वांगीन विकासासाठी १५ आॅक्टोबरपासून उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता सदर गावातील सरपंच, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येत आहे. शिवसैनिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पात हागणदारीमुक्त गाव, सार्वजनिकस्थळी शौचालय बांधणे, दारूबंदीकरिता कार्यक्षम मंडळ स्थापन करणे, प्रलंबित शासकीय योजनांचा पाठपुरावा घेवून योजना मार्गी लावणे, शेतीला पुरक जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, शासकीय योजना गरजूपर्यंत पोहचतील याची कआळजी घेणे, गावविकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करून गरजुलआ न्याय मिळवून देणे, कारंजा तालुक्यात एस.टी. आगाराची निर्मिती आदी बाबींवर प्रकल्पात काम करण्याचे देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेत शिवसेना शहर प्रमुख संदीप गाखरे, तालुका प्रमुख प्रकाश घागरे, महिला प्रमुख ज्योती हरणे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)