पुलाचे संरक्षक कठडे तुटले
By Admin | Published: April 24, 2017 12:26 AM2017-04-24T00:26:21+5:302017-04-24T00:26:21+5:30
वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले.
अपघाताची भीती : संभाव्य धोका टाळण्यासाठी दुरूस्तीची गरज
वर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावरील बोरगाव (मेघे) व इंझापूर या दोन गावाना जोडणाऱ्या पुलाचे संरक्षण कठडे गत काही महिन्यांपूर्वी तुटले. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू पाहत असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची गरज आहे.
कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून नाल्याच्या पुलाला निर्मितीच्यावेळी संरक्षण कठडे लावण्यात आले होते. कठडे नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आल्याचे तसेच अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तुटलेले संरक्षण कठड्यामुळे अपघाताची भीती बळावत असून त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
एकीकडे रस्ता सुरक्षा अभियानाच्यामाध्यमातून अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, तुटलेल्या संरक्षण कठड्याकडे दुर्लक्ष केल्या जाता असल्याने शासनाच्या उद्देशालाच खो मिळत आहे. या मार्गावर नेहमीच छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, अनेक वर्ष लोटूनही तुटलेल्या कठड्याच्या दुरूतीकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तुटलेल्या कठड्याची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
यशोदा नदीवरील तुटलेल्या पुलाच्या कठड्याकडे दुर्लक्षच
वायगाव (नि.)- सरुळ मार्गावर यशोदा नदीवरील पुलाचे कठडे तुटलेले आहे. राळेगाव व चंद्रपूर जाण्यासाठी हा मार्ग सोईचा आहे. तसेच या मार्गावर मोठ्या कंपन्याही आहेत. या मार्गाने छोट्या-मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
परिसरातील जनतेच्या दृष्टिने हा अतिशय महत्त्वचा पुल आहे. पण, यावरील कठडे तुटले आहे. आता पर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. पुलावरील तुटलेल्या संरक्षण कठड्यामुळे मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्याची संबंधित विभागाने दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
-योगिता देवढे, सरपंच बोरगाव(मेघे).
बोरगाव(मेघे)-इंझापूर व सरुळ यशोदा नदीवरील या दोन्ही पुलावरील संरक्षक कठडे बनविण्याबाबत शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव टाकला आहे. मंजुरी मिळताच त्वरीत काम सुरू करण्यात येईल.
- अनिल भुत, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देवळी.