कृषी जागृती सप्ताहातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By admin | Published: May 6, 2016 02:00 AM2016-05-06T02:00:20+5:302016-05-06T02:00:20+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
१ ते ७ मेपर्यंत सप्ताह : विभागाकडून कृषी विषयक माहिती
आर्वी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कृषी जागृती सप्ताहामध्ये तालुक्यातील गावात सभा घेऊन कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आदी पिकांबाबतची माहिती दिली जात आहे. शिवाय कृषी विषयक विविध योजनांबाबतही गावोगावी सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. बिज प्रक्रिया, माती परीक्षण, उताराला आडवी पेरणी, सरी वरंबा पद्धत, बियाणे बदल, कमी खर्चात करावयाची शेती, रासायनिक खताचा कमी वापर, सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या विविध योजना यांत्रिकीकरण, राष्ट्रीयल फलोत्पादन अभियांतर्गत कांदा चाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देत जागृती केली जात आहे.
कृषी जागृती सप्ताहामध्ये क्षेत्रीय स्तरावर मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गावोगावी सभा घेत आहेत. खरीप हंगामातील पिकांची कमी खर्चात प्रती हेक्टर सरासरी वाढविणे आणि कृषी विभागाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कृषी जागृती सप्ताहाचा उद्देश आहे. सप्ताहाच्या यशाकरिता कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
जनजागृती सभा
कोरा : कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यातील सर्व गावांत कृषी जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत वासी, आसोला, पवनगाव, गांगापूर, खापरी, चापापूर, खेक या गावांत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. कोरा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. यात कृषी सहायक बाबाराव वागदे, यांनी उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, माती परिक्षण करूनच रासायनिक खताचा वापर, पिकांची निरक्षणे घेऊन किटकनाशकाची फवारणी करणे, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बिज प्रक्रिया करणे व महत्त्व, कपासी पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड, तंत्रज्ञान, कडधान्याचा पीक पेरा वाढविणे व इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण चौधरी, राम पंढरे, चिंधू शेंडे, शाहु पंढरे व शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)