कार्यशाळेतून जलयुक्त शिवाराविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:23 PM2017-08-31T22:23:43+5:302017-08-31T22:23:57+5:30
कृषी विभाग व जलसंधारण विभाग तसेच सद्भावना ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान जिल्हा वर्धा अंतर्गत ग्रामस्तरावरील प्रतिनिधी व कर्मचारी.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी विभाग व जलसंधारण विभाग तसेच सद्भावना ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान जिल्हा वर्धा अंतर्गत ग्रामस्तरावरील प्रतिनिधी व कर्मचारी यांची तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मंडळींनी विविध पैलुंची माहिती दिली.
शिबिराचे उद्घाटक जलयुक्त शिवार अभियान समितीचे जिल्हाध्यक्ष माधव कोटस्थाने यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रेहपाडे, मिलिंद भगत, डॉ. सचिन पावडे, पाटील, देवेंद्र ठाकरे, नितीन महाजन, देशकर, निपाणे व प्रशांत देवढे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिबिरात जलयुक्त शिवार अभियानाची गरज, क्षेत्रीय उपचार, पाण्याचे अंदाजपत्रक, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभाग, विविध यंत्रणा व त्यांची जबाबदारी, मनरेगा अंतर्गत करावयाची कामे, मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय आदिची माहिती देण्यात आली.
सेलू, देवळी, समुद्रपूर तालुक्यातील एकूण १३८ गावांचा सहभाग जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला आहे. राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. याचा कृषी क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होत आहे. राज्यातील सिंचनाच्या सोईचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा अवर्षण प्रवण क्षेत्रातील मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, विषम, अनिश्चित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता तसेच या परिस्थितीत मुख्यत्वे करून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन २०१७-१८ करिता निवड झालेल्या गावातील सरपंच, प्रगत शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी मित्र, जल सेवक, महिला प्रतिनिधी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांची या प्रशिक्षण शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद भगत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निपाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रविण लढी यांनी मानले.