गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:47 PM2018-09-04T23:47:38+5:302018-09-04T23:50:23+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाºयांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ्याला सर्वच मुकणार आहेत.

Guruji has lost his gaurav ceremony | गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी

गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी

Next
ठळक मुद्देनामुष्की : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे शिक्षकदिनाचा कार्यक्रम रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ्याला सर्वच मुकणार आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशभर ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शासनाकडून गौरव केला जातो. जिल्हास्तरावर सुद्धा उत्कृष्ठ कार्य करणाºया शिक्षकांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा या दिवशी सन्मान करण्यात येतो; पण नियोजनाअभावी यंदाच्या शिक्षक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्कृष्ट शिक्षकांचे प्रस्ताव बोलावण्यातच विलंब झाला. सोबतच उत्कृष्ट शिक्षकांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे अनेक शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास अनुत्साही आहेत. त्यातही वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेशी तयारी केली नाही. शिवाय पाठपुरावा न केल्याने प्रस्ताव येण्यासही विलंब झाला. असे असतानाही जे प्रस्ताव तालुक्यातून प्राप्त झाले त्या प्रस्तावांची छाननी करून जि.प. अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समितीची सभा बोलावून पुरस्कार प्राप्त शिक्षकांची घोषणा करणे आवश्यक होते. तसेच पत्रिका निश्चित करुन ती छापण्यास देणे, प्रमाणपत्र गौरव चिन्ह यासाठी निविदा बोलावणे आदी निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने प्रथमच जिल्हा परिषदेवर ही नामुष्की ओढवली आहे.
यांचा झालाय हिरमोड
शिक्षकदिनी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी एक प्रमाणे आठ शिक्षकांचा गुणगौरव केला जातो. तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश प्राप्त करून उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी गुणगौरव करण्यात येतो. पण, यावर्षी नियोजनशुन्यतेमुळे हा कार्यक्रम होणार नसल्याने या सर्वांचा हिरमोड झाला आहे.
शिक्षण विभागाचा कारभार ढेपाळला
सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वभावामुळे व वर्तणुकीमुळे पदाधिकारी, प्रशासनिक यंत्रणा, शिक्षक आणि सर्वच कर्मचारी वैतागले आहे. कोणत्याच कामात नियोजन नसून केवळ अडथळे निर्माण करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागात सुरू आहे. शासनाकडे तक्रारी करूनही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बाबतीत कोणताच निर्णय होत नाही. देशात राज्यात आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना सुद्धा एक अधिकारी सर्वांनाच वेठीस धरत असल्याचे कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे.
यापूर्वीही कार्यक्रम रद्द झाला; पण...
दरवर्षी शिक्षकदिनी कार्यक्रमाचे आयोजन केले जात. त्यासाठी शिक्षकदिनापर्यंत सर्व नियोजन असायचे. मिलींद भेंडे हे शिक्षण सभापती असताना शिक्षकदिनीच महालक्ष्मी पूजन असल्याने त्यावर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीदिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत संपन्न झाला होता; पण या कार्यक्रमाची तयारी शिक्षकदिनापर्यंत पुर्ण झाली होती. यंदा अद्यापही कार्यक्रमाचे कुठलेच नियोजन नाही.
शिक्षक समितीने केला निषेध
ग्रामीण भागात शासन व जि.प. प्रशासनाकडून तात्काळ गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. शिक्षकांकडून प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करण्याची सक्ती करताना विलंब झाल्यास कार्यवाहीची धमकी दिल्या जाते. त्याच शिक्षण विभागात यंदा शिक्षकदिनाचा कार्यक्रम होणार नसल्याने त्याचा म.रा. प्राथमिक शिक्षक समितीकडून निषेध करण्यात आला आहे.

जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. शिवाय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. सूचविलेल्या बाबींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने हा शिक्षकदिनाचा कार्यक्रम घेता आला नाही. याला शिक्षणाधिकारी जबाबदार आहे.
- जयश्री गफाट, सभापती,
शिक्षण व आरोग्य समिती,
जि. प. वर्धा.

...अन् मुख्य कार्यपालन अधिकारीही भडकले
शिक्षण विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विसंवादामुळे कार्यक्रमाला ग्रहण लागले आहे. दरवर्षी जिल्ह्याचे खासदार आणि आमदार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची यावर्षी पत्रिका निश्चित करताना शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी खासदार, आमदारांना न बोलावण्याचा निर्णय घेत त्यांच्या नावावर आणि खासदार, आमदार या पदावलीवर रेघ ओढण्याचा प्रकार घडला. त्यानंतर मात्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना हे कळल्यावर त्यांनी चांगलेच खडसावल्याने त्यात सुधारणा करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदमध्ये आज होती.

Web Title: Guruji has lost his gaurav ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.