रिमझिम पावसात गजबजल्या शाळा
By admin | Published: June 28, 2017 12:52 AM2017-06-28T00:52:12+5:302017-06-28T00:52:12+5:30
दोन महिन्यांच्या सुट्यानंतर मंगळवारी शाळांचा पहिला ठोका पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी रिमझिम पाऊस असल्याने कोणी शाळेत येईल
पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत : शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दोन महिन्यांच्या सुट्यानंतर मंगळवारी शाळांचा पहिला ठोका पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी रिमझिम पाऊस असल्याने कोणी शाळेत येईल अथवा नाही असे वाटत असताना या पावसाच्या उपस्थित शाळेचा हजेरीपट पूर्ण असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद, नगर पालिका व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागताकरिता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्यासह इतर पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शाळांना भेटी देत चिमुकल्यांचे स्वागत करीत त्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिजविण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाचा चिमुकल्यांसह आस्वाद घेतला.
शाळेचा पहिला दिवस असल्याने खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाणाऱ्यांना त्यांच्या वर्गमित्रांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नव्या वर्गखोलीत आपल्या आवडीचा बाक पकडण्याकरिताही विद्यार्थ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून आले. तर पहिल्यांदाच शाळेत जात असलेल्या नवागतांना शाळा म्हणजे काय, याची उत्सूकता दिसून आली. शाळेत जाताना मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत असल्याचे दिसून आले. तर आपल्या चिमुकल्याला शाळेत सोडताना पालकांची होत असलेली चलबिचल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. चिमुकल्याचे रडणे त्यांना घरी नेण्यास बाध्य करीत होते तर तो शाळेत गेला पाहिजे याकरिता कठोर केलेल्या मनाची तगमग शाळेच्या फाटकाआडून बघणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.