गारपीटग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित
By admin | Published: May 11, 2014 12:32 AM2014-05-11T00:32:24+5:302014-05-11T00:32:24+5:30
गारपीटग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली. ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या याद्या कृषी व महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आल्या.
तळेगाव (श्या.) : गारपीटग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली. ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या याद्या कृषी व महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आल्या. या याद्या ग्रा. पं. कार्यालयात प्रसिध्द केल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकर्यांनी ज्या बँकेचे खाते दिले. सदर बँकेत कृषी विभागातर्फे यादी व धनादेश दिल्यानंतर शेतकर्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. कारण चुकीचा खातेक्रमांक दिल्याने आर्थिक मदत खात्यात जमा झाली नाही. राज्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यात आलेल्या वादळी पावसाने कहर केला. तालुक्यात अकाली पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्यावतीने त्वरीत सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणात ५० टक्यांवर शेती पिकाचे नुकसान झाले त्या क्षेत्राची व बाधित शेतकर्यांची यादी करण्यात आली. पण बँकेच्या गलथान कारभाराने शेतकर्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. तळेगाव परिसरातील जुनोना, देवगाव, तळेगाव, रानवाडी, दैऊतपूर, टेंभा या भागातील जास्तीत जास्त शेतकरी बँक आॅफ महाराष्ट्र सोबत जोडल्याने या शेतकर्यांनी याच बँकेचे खाते क्रमांक दिले. मात्र खात्यात पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.(वार्ताहर)