जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:14 PM2019-03-20T21:14:44+5:302019-03-20T21:15:22+5:30
वर्धा तालुक्यातील पवनार तर समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या गहू व चना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना गारपिटीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार/समुद्रपूर/गिरड : वर्धा तालुक्यातील पवनार तर समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या गहू व चना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना गारपिटीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे एका बैलाचा झाडाखाली दबून मृत्यू झाला. महसूल विभागाने तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आहे.
दिवसभर अंगाला चटके देणारीच ऊन होती. परंतु, सूर्य मावळतीला जाताना दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. पवनार परिसरात बघता बघता वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचा बार गळला असून शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गिरड परिसरातील मोहगाव, धोंडगाव, आर्वी, अंतरगाव, परिचिस्तूर, भवानपूर आदी भागात दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेत पिकांचे नुकसान झाले असून काही घरांसह गोठ्यांवरील टिनपत्रे उडाल्याचे सांगण्यात येते. या भागात बोराच्या आकाराची गार पडली हे विशेष.
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड), कोरा, कांढळी, कानकाटी, बरबडी शिवारात बुधवारी दुपारी वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेकडो एकरातील उभ्या रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वायगाव (गोंड) परिसरात झाड उन्मळून पडत त्याखाली बैलाचा दबुन मृत्यू झाला. हा बैल गिरधर राऊत यांच्या मालकीचा होता असे सांगण्यात आले. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी चणा, गहू या पिकाची कापणी करून त्याचा ढिग शेतातच करून ठेवला होता. परंतु, अचानक आलेल्या पावसासह गारपिटीमुळे ते कापलेले पीक ओले झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.
या वादळीवाऱ्यासह गारपिटीचा गहु, हरभरा, ज्वारी, मका व भाजीपाला पिकांना चांगलाच फटका बसला आहे. काही परिसरात पेरूच्या आकाराएवढी तर काही ठिकाणी बोराच्या आकारा इतकी गार पडल्याचे प्रत्यक्षदर्शीयांनी सांगितले.