गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:47 PM2018-02-13T22:47:16+5:302018-02-13T22:47:35+5:30

एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले.

Hail storm | गारपिटीचा तडाखा

गारपिटीचा तडाखा

Next
ठळक मुद्देगारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले. परिणामी, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूरता गारद झाला आहे. खासदारांनी नुकसानाची पाहणी केली असली तरी शासकीय सुटी असल्याने प्रशासन निद्रीस्तच दिसून आले.
काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले होते. काहींनी दक्षता घेत तुरीच्या पेट्या झाकून ठेवल्या; पण शेतातील पिकांचे रक्षण कसे करावे, हा प्रश्नच होता. रविवारी आलेल्या पावसामुळे फारसे नुकसान झाले नव्हते; पण सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कापून ढीग मारून ठेवलेल्या तुरीसह शेतातील पिकांचीही धुळधान झाली. खरांगणा (मो.) परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले. यानंतर देवळी-पुलगाव तालुक्यात मुसळधार पावसासह गारपिटीने धुमाकूळ घातला. लिंबाच्या आकाराची गार पडल्याने शेतातील कुठलेही पीक वाचू शकले नाही. गहू जमिनीवर लोळला असून चण्याचेही प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे गव्हाचे पीक नेस्तनाबूतच झाले असून उत्पादन झाले तरी त्या गव्हाला कुणी विचारणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हरभरा जमिनीवर आडवा झाल्याने तो वाळू देत सवंगणी करणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुसळधार पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेल्या तुरीही हाती येणार की नाही, ही शंकाच आहे. सर्वत्र पाण्याचे लोट गेल्याने झाकलेल्या ढीगातील तुरीचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सोमवारी देवळी, आर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे जमीन शुभ्राच्छादित झाली होती. वर्धेतील रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गारपीट झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीमुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील कवेलू फुटलेत. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याचेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी प्रशासनाकडे किती व काय नुकसान झाले, याबाबत आकडेवारी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
गारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळले
मुसळधार पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे विरूळ (आकाजी) परिसरात भाजीपाला पिके पूर्णत: धुळीस मिळालीत. पालक, मेथीची शेती गारपिटीमुळे नष्ट झाल्याचे दिसून येत होते.
शिवाय दाणापूर, ब्राह्मणवाडा, खैरवाडा येथे गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजीपाला पिके जमिनीवर लोळली तर मोठी झाडेही उन्मळून पडल्याचे दिसून येत होते.
रबी पिकांना फटका
दारोडा - सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चना, गहू, कापूस, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे घराची छप्परे उडाली. झाडे तुटून पडली. दारोडा येथील मोटघरे यांच्या घराचे टिनाचे छप्पर गावातील रस्त्यावर येऊन पडले. यात कुठलीही प्राणहाणी झाली नाही. पशू, पक्षी मृत झाल्याचे दिसून आले. गारपीट व वादळ १० ते १५ मिनिटपर्यंत सुरू असल्याने फारसे नुकसान झाले नाही; पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिके नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येतो. अनेक गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले.
वादळी पाऊस व गारपीट
सेलगाव (लवणे) - दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परिसरात वादळी पाऊस व बोराच्या आकाराचे गारपीट झाले. यामुळे संत्रा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला आहे. वादळामुळे शेतात झाकून असलेल्या तुरीच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने संपूर्ण ढीग ओले झाले. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडालीत. निसर्गाच्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.
पंचनामे करीत तात्काळ मदत द्या -रणजीत कांबळे
राज्याच्या अनेक भागासह जिल्ह्यात वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, किमान बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत तरी जाहीर करावी, अशी मागणी आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात अनेक ठिकाणी वादळ व गारपिटीने थैमान घातल्याच्या तक्रारी आहेत. यात तिघांचा बळी गेला असून कांदा, हरभरा, गहू आदी रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून कापणी केलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातही वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. या नुकसानाची त्वरित मोका पाहणी करण्याची मागणी आम्ही केली होती. शासनाने आदेशही दिले आहेत. नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा आढावा घेत भरीव मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे.

Web Title: Hail storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस