पोळ्यासाठी आलेला दारूसाठा जप्त
By admin | Published: September 11, 2015 02:26 AM2015-09-11T02:26:20+5:302015-09-11T02:26:20+5:30
बुट्टीबोरीवरून कारने सेलू मार्गे जाणारा दारूसाठा पोलिसांनी पकडला. पोलीस वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने दारू विक्रेते कार सोडून पळून गेले.
सेलू पोलिसांची कारवाई : ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल
सेलू: बुट्टीबोरीवरून कारने सेलू मार्गे जाणारा दारूसाठा पोलिसांनी पकडला. पोलीस वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने दारू विक्रेते कार सोडून पळून गेले. गुरुवारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी वाहनासह ४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान केळझर टोल नाका परिसरात एमएच ०२ एक्यू ३०७८ क्रमांकाची कार भरधाव जाताना दिसली. या कारमध्ये दारूसाठा असल्याचे कळताच पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. भरधाव कार नागपूर-वर्धा महामार्गावरून कोटंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने वळली. पाठलाग सुरू असतानाच कारचे मागचे चाक पंक्चर झाले. यावेळी कारचे दार लॉक करून आरोपी पळून गेले. पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी सेलू ठाण्याला माहिती दिली. ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक देवेंद्र पवार, राजू वैद्य, कैलास वालदे, प्रशांत वैद्य यांनी कारची दारे तोडून ७६ हजार ८०० रुपयांचा विदेशी दारूसाठा ४ लाख रुपयांची कार असा एकूण ४ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू पोळ्याच्या सणाकरिता आल्याचे उघड झाले.(तालुका प्रतिनिधी)
वाहनासह दारूसाठा जप्त
गिरड : सिर्सी मार्गे वर्धेकडे जात असलेला अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई साखरबावली शिवारात गुरूवारी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास गिरड पोलिसांनी केली.
याप्रकरणी सद्दाम कुरेश शब्बीर कुरेशी (२२), शेख बशीर शेख रहमी कुरेशी (१९) दोघे रा. पुलफैल वर्धा या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाई कार क्र. एमएच ३१ सीआर ५५२३ ने विदेशी दारू असलेल्या तीन पेट्या व देशी दारू असलेल्या ७ पेट्या असा एकूण ४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर, विशाल ढेकले, पंकज चाकोने यांनी केली.(वार्ताहर)