पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:09 PM2019-04-27T21:09:51+5:302019-04-27T21:10:26+5:30

येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला.

Half of the village's water supply was stopped for five days | पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देदेशमुखांकडून दलित वस्तीला पाणीपुरवठा। ग्रा. पं. ची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेड : येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला. तात्पुरता का होईना गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र असलेल्या टाकरखेड या गावात कधी नव्हे, एवढी भीषण पाणीसमस्या निर्माण झाली. याला संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कारभारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गत पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष केल्याने विहिरीत गाळ साचून झरे बुजले आणि पाणीपातळी खालावली. तसेच गडी वॉर्ड व दलित वस्ती ही उंच भागात येत असल्याने येथे नळाद्वारे पाणीपुुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दुसरी टाकी उभारून अर्धे-अर्धे गाव याला जोडण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यता आणि कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. या भागातील टाकी कधीच पूर्ण भरली जात नाही. त्यामुळे या भागाला अल्प प्रमाणात पाणी आणि तेही काही भागात नळाद्वारे पोहोचत नसल्याने सर्वत्र मोटारपंप बसविण्यात आले. ज्यांच्याकडे मोटारपंप नाही, त्यांच्या नळाला पाणीच येईनासे झाल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.
संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. या महिन्यात पाणीसमस्या आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. यातूनच जनक्षोभ वाढू शकतो. टाकरखेड्यात जनआंदोलन उभे होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
गेल्या पाच दिवसांपासून या भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत होती. महिलांना होणारा त्रास पाहून लहानूजी महाराज संस्थानचे उपाध्यक्ष डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीतून पाईप लाईन टाकून दलित वस्तीला पाणीपुरवठा केला. त्यामुळे तात्पुरती का होईना पाण्याची गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पण अशीच अपेक्षा आता नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Half of the village's water supply was stopped for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.