निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 05:00 AM2021-05-30T05:00:00+5:302021-05-30T05:00:02+5:30

 वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.

Half of Wardha city will not get water for three days! | निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

googlenewsNext
ठळक मुद्देयेळाकेळीत ‘धाम’ होतेय स्वच्छ : पाणी जपून वापरण्याचे न.प.चे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
 वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

या भागातील नळांना येणार नाही पाणी
- धाम नदीपात्र स्वच्छ केले जात असल्याने वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड, कृष्णनगर, बॅचलररोड, राजकला टॉकीज रोड, भामटीपुरा, तेलीपुरा, साईमंदिर रोड, निर्मल बेकरी, रामनगर, धंतोली, पोद्दार बगिचा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, सराफ लाईन, अंबिका चौक, पटेल चौक, गुजराती भवन, पावडे चौक, राधानगर, म्हाडा कॉलनी, मानस मंदिर, गजानननगर, गोंड प्लॉट, स्टेशन फैल, तारफैल, दयालनगर, अशोकनगर, एम.जी. कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी या भागात पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही.

तीन दिवसांत काढणार २५ हजार घनमीटर गाळ
- धाम स्वच्छता अभियान अंतर्गत तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ नदीपात्रातून काढण्यात येणार आहे. पोखलेनच्या मदतीने दोन मीटर खोल व बंधाऱ्यापासून १ किमी लांब पोखरून धाम नदीपात्रात गाळ काढण्यात येणार आहे. या कामासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था विशेष सहकार्य करीत आहे.

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेचे विशेष सहकार्य या कामाला लागत आहे. तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.
- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.
 

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून गाळ काढल्या जात असल्याने पुढील तीन दिवस वर्धा शहरातील अर्ध्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. 
- नीलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न.प. वर्धा.

 

Web Title: Half of Wardha city will not get water for three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.