हागणदारीमुक्त ग्रामयोजनेचा फज्जा
By Admin | Published: September 21, 2015 02:00 AM2015-09-21T02:00:46+5:302015-09-21T02:00:46+5:30
शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या संताच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवित येत आहे.
जनजागृतीचा अभाव : शौचालय असताना वापर होतो नाममात्र
तळेगाव (श्या.पं.) : शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या संताच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवित येत आहे. या अभियातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येते. मात्र तळेगावात या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळते. ग्रामस्थांकडे शौचालय असले तरी त्याचा वापर नाममात्र होत असल्याने स्वच्छताविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो.
गावातील रिकाम्या भूखंडाचा वापर शौचविधी उरकण्याकरिता होत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासन ग्रामीण भागातील नागरिकांत स्वच्छताविषयक जागृती निर्माण करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. गाव हागणदारीमुक्त करण्याकरिता शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून येथेही घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र त्याचा वापर माफक होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातून हागणदारीमुक्तीसाठी शासन विविध पुरस्कार देते. मात्र पुरस्कार प्राप्त गावांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे. शौचास बाहेर जाणाऱ्यांना चाप लावण्यासाठी गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले. मात्र कारवाईचा अभाव असल्याने हे पथक नाममात्र ठरत आहे. आष्टी तालुक्यातील ४१ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावात रस्त्यावर शौचाला बसण्याचा प्रकार पहायला मिळतो. जिल्ह्यात मागील पाच वर्षात स्वच्छता अभियान आष्टी तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात राबविण्यात आले. तरीही ग्रामस्थांत जागृतीचा अभाव दिसून येत असल्याने योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.(वार्ताहर)
नवनियुक्त बीडीओंकडून ग्रामस्थांना अपेक्षा
पंचायत समितीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले नव्या उमेदीचे गटविकास अधिकारी श्रेणी एकमधील एम.एस. चव्हाण हे रूजू झाले आहेत. या तालुक्यात पुन्हा हागणदारीमुक्त गाव अभियानाला सुरुवात करावी. जे ग्रामस्थ रस्त्यावर शौचास बसतात, त्यांच्याकडे शौचालय आहेत काय, जर असतील तर उपयोग का करीत नाही, शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन रस्त्यावर शौचाला बसत असेल तर त्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नवनियुक्त बीडीओ चव्हाण यांच्याकडून अनेक सुज्ञ ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पंचायत समिती प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारण्याऐवजी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. योजनेतून शौचालय बांधणी होत नसेल तर शासनाने भरीव निधी शौचालय बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. ग्रामस्थांनीही घरी शौचालय बांधून प्रशासनाला सहकार्य करावे.
- माधुरी गो. बुले, सदस्य, पं.स. आष्टी (श.).
पुरस्कारांची रक्कम जाते कुठे ?
पुरस्कार मिळाल्यानंतर त्या बक्षिसाची रक्कम ही त्या गावाने आपल्या स्वच्छतेच्या सोयी-सुविधा टिकविण्यासाठी, त्यात सुधारणा करण्यासाठी त्याचा विनियोग करावा, अशी शासनाची अपेक्षा आहे; पण हा पैसा जातो कुठे, हा संशोधनाच्या विषय आहे. थेट राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी योजनेचा दर्जा उत्तम राहावा यासाठी जनजागृती करावी, दुर्लक्ष केलेल्या ग्रामस्थांना प्रबोधन करावे, तेव्हाच हेतू साध्य होऊ शकेल.