हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:27 PM2018-03-05T23:27:29+5:302018-03-05T23:27:29+5:30

पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात.

Handpumps, wells are being considered ineffective | हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी

हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी

Next
ठळक मुद्देदुरूस्तीची यंत्रणा अपुरी : तक्रारीनंतरही कार्यवाहीला होतो विलंब

आॅनलाईन लोकमत
वर्धा : पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या उरफाट्या कारभारामुळे जिल्ह्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे आदी अनेक उपाय सूचविले जातात; पण हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी, अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात. वर्धा शहरातील गजानन नगर परिसरातील काही हातपंप मागील कित्येक दिवसांपासून बंद आहे. यासह म्हाडा कॉलनी तथा अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळेही हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. जिल्हा प्रशासन, जि.प. प्रशासनाने याकडे लक्ष देत हातपंप सक्षम करणे गरजेचे झाले आहे.
आकोलीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेत
आकोली - गोसावी नगर तथा हेटी येथील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबंधित यंत्रणा दुरूस्तीबाबत तसदी घेत नाही.
गोसावी नगर व हेटी येथील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत कायम उदासीन भूमिका घेतली जात आहे. काही हातपंपांची चेन तुटली तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे. यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवक राजेंद्र बावणकर यांनी तक्रार करूनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.
दांडे झुकलेले हातपंप शोभेचे
आकोलीसारखीच स्थिती जिल्ह्यातील अनेक गावांत आहे. हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी, हे हातपंप शोभेचे ठरत आहेत. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती, मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी मात्र वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी अनेक गावांतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Handpumps, wells are being considered ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.