शाळेतील तेल, चणा घरी नेणारी मुख्याध्यापिका गावकऱ्यांच्या हाती
By Admin | Published: April 2, 2016 02:34 AM2016-04-02T02:34:00+5:302016-04-02T02:34:00+5:30
विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शालेय पोषण आहारातील तेल व चना खुद्द मुख्याध्यापिका घरी नेत असल्याचा प्रकार ...
शालेय पोषण आहार घरी : शिक्षण समितीने पकडले रंगेहात
समुद्रपूर : विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शालेय पोषण आहारातील तेल व चना खुद्द मुख्याध्यापिका घरी नेत असल्याचा प्रकार तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील उच्च प्राथमिक शाळेत उघड झाला. शालेय पोषण आहाराच्या वस्तू घरी नेणाऱ्या या मुख्याध्यापिकेला शिक्षण समितीच्या सदस्यांनी रंगेहात पकडले. चंद्रकला वरघणे असे या मुख्याध्यापिकेचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघड झाला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत येत असलेल्या चिमुकल्यांना पोषण आहार देण्याची योजना शासनाने अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्याच काळापासून ती चर्चेत राहिली. कधी तांदळाचा घोळ तर आता योजनेतील साहित्य घरी नेण्याचा प्रकार उघड झाला आहे. वायगाव (हळद्या) येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला वरघणे या शाळेतील पोषण आहाराचे साहित्य घरी नेत असल्याची पुसटशी कल्पना शिक्षण समितीच्या सदस्यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी शिक्षण समिती व गावकऱ्यांनी सापळा रचून मुख्याध्यापिकेला सोयाबीन तेल व अर्धा किलो चना या वस्तूंसह शाळेच्या बाहेर वासुदेव पाटील यांच्या घरासमोर रंगेहात पकडले.
मुख्याध्यापिका वरघणे या सुट्टी झाल्यानंतर सर्व शिक्षक गेल्यानंतर घरी जायच्या. त्यांच्याकडून हा प्रकार गत दोन वर्षांपासून सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापिकेला पकडल्यानंतर शिक्षण समिती सदस्यांनी तहसीलदार सचिन यादव यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद, विस्तार अधिकारी हेडाऊ व केंद्रप्रमुख नाशीरकर शाळेत दाखल झाले. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे बयान नोंदवून घेतले. सोबतच शालेय पोषण आहाराचा अहवाल सील करण्यात आला आहे. धान्यसाठा असलेली खोली सुद्धा सील केली. शनिवारी शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड व उपलब्ध धान्य साठा तपासण्यात येईल. यानंतर सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद यांनी सांगितले. वरघणे यांच्या पिशवित सापडलेले खाद्य तेल व चना सील करून जप्त करण्यात आला. यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश दळणे, ग्रा.पं. सदस्य सुनिता घुमडे, सचिन घुमडे, महेंद्र भोले, माजी सरपंच किशोर घुमडे, प्रभाकर घुमडे, प्रदीप मोगरे, अनिल भूरे, विठ्ठल घुमडे व गावकरी उपस्थित होते. सदर विषय पंचायत समितीच्या आजच्या सभेत चर्चेत घेण्यात आला. तसेच कारवाईच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली.(शहर/तालुका प्रतिनिधी)
पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा
या प्रकाराची माहिती होताच येथील पंचायत समितीत आयोजित असलेल्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात आली. सर्वच सदस्यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला. शिवाय या प्रकरणी कारवाई करण्याबाबत चर्चा करीत सदर विषय सभेच्या इतिवृत्तात समाविष्ट केला.