वर्धा जिल्ह्यातल्या पांढुर्णा आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:46 AM2018-01-12T11:46:28+5:302018-01-12T11:53:57+5:30
आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल येथील विशेष न्यायाधीश अंजू शेंडे यांनी गुरुवारी दिला. मुलींच्या वसतिगृहाची अधीक्षक वैशाली दिघोरे हिला कलम २१(२) बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत ६ महिने सश्रम कारावास व १००० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, राजू उर्फ राजकुमार लांडगे हा पांढुर्णा येथील आश्रम शाळेतील नवीन इमारतीवर चौकीदार म्हणून काम करीत होता. शाळेतील अल्पवयीन आदिवासी मुली त्याला राजूदादा म्हणूनच ओळखत होत्या. याच गोष्टीचा गैरफायदा घेवून राजूने या मुलींचे लैंगिक शोषण सुरू केले. दोन मुलींवर बलात्कार केला. प्रकरणाची माहिती एका मुलीने आई-वडिलांना दिल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. चौकशीअंती राजूने यापूर्वी देखील दुसऱ्या पीडित मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली असता दुसऱ्याही प्रकरणात त्याचेविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.पहिल्या प्रकरणातच त्याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणातही त्याला शिक्षा सुनावण्यात आली. याचवेळी भादंविचे कलम ३७६ (ई) हे नव्याने दुरूस्ती करून कायद्यामध्ये घेतले.
अशा प्रकारच्या केसेसमध्ये आजपर्यंत कोणतेही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही न्यायनिवाडे उपलब्ध नसल्यामुळे विद्यमान कोर्टाने वर्धा येथील ज्येष्ठ वकील पी.बी. टावरी यांची अॅमिकस क्युरी (कोर्टाचे मित्र) म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे सदर प्रकरणात त्यांनी कोर्टाला हा न्यायनिवाडा देण्यात मदत केली . आरोपीविरूद्ध दोष सिद्ध होताच नवीन कायद्यानुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीविरूद्ध पुरावे गोळा करून उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
२० वर्षानंतर फाशीचा निर्णय
वर्धा न्यायालयात यापूर्वी १९९७-९८ साली सुरेश मसराम या आरोपीस कलम ३७६ भादंवि व ३०२ भादंवि अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सदर प्रकरणात त्यावेळेस आजचे जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीष तकवाले हे आरोपीचे वकील होते व आज झालेल्या न्यायनिवाड्यात गिरीश तकवाले यांनी सरकारची बाजू यशस्वीपणे मांडून आरोपीस फाशीची शिक्षा दिली.
सुधारित कायद्यानंतर राज्यात दुसरी फाशी
मुंबई येथील शक्ती मिल प्रकरणात तत्कालीन न्यायाधीशांनी चार आरोपींना सुधारीत कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढुर्णा प्रकरणात आरोपीला पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.