हर हर महादेवचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:05 PM2019-03-04T22:05:16+5:302019-03-04T22:05:38+5:30
महाशिवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी अनेक शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिव चरणी माथा टेकविला. या प्रसंगी भाविकांनी सुख, समृद्धी आणि विश्वशांतीसाठी ईश्वराला साकडेच घातले. सोमवारी वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ५ वाजेपासून एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाशिवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी अनेक शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिव चरणी माथा टेकविला. या प्रसंगी भाविकांनी सुख, समृद्धी आणि विश्वशांतीसाठी ईश्वराला साकडेच घातले. सोमवारी वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ५ वाजेपासून एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होती.
वर्धा शहरातील महादेवपुरा भागात प्राचिन शिव मंदिर आहे. हे मंदिर वर्धा शहरासह शहराबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे नेहमीच भाविक दर्शनासाठी येतात. शिवाय श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांचा मळा फुलतो. या मंदिरात मोठे शिवलिंग असून शिवचरणी नतमस्तक होणारे अनेक भाविक नवसाचा संकल्प सोडतात.
मंदिराच्या आवारात विहीर असून एक मोठे आणि फार जूने पिंपळाचे वृक्ष आहे. मंदिरात येणारे नागरिक शिवचरणी नतमस्तक होण्यासह या पिंपळाच्या वृक्षाच्या शेजारी देवी-देवतांच्या मूर्ती असल्याने त्यांचेही मनोभावे पूजन करतात.
सोमवारी पहाटे ५ वाजता आरती झाल्यापासून शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी उशीरापर्यंत कायम होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वर्धा शहर पोलिसांच्यावतीने येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
भक्तिमय वातावरणाची निर्मिती
महादेवपुरा भागातील शिव मंदिरात सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दर्शनासाठी येथे भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. रांगेत उभे राहून दर्शनाच्या प्रतीक्षेत असेले भाविक राहून राहून ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत होते. एकूणच महादेव मंदिर परिसरात आज भाविकांच्या उत्साहामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी दिला खडा पहारा
महाशिवरात्रीचे औचित्य साधून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊ नये यासाठी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने एक अधिकारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती महादेवपुरा भागातील महादेव मंदिराच्या आवारात करण्यात आली होती.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आपल्या चमूसह शिव मंदिर गाठून येथील सुरक्षेचा आढावा घेतला. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही विशेष प्रयत्न केले.