अन् कठोर मनांना फुटला माणुसकीचा पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:44 PM2018-12-04T21:44:35+5:302018-12-04T21:45:14+5:30
पोलीस म्हटले की कठोर मनाचे. त्यांच्याबाबत चिमुकल्यांसह वयोवृद्धांच्या मनात भीतीयुक्त आदर असतोच. परंतु, याच खाकीतील कठोर मनांना रस्त्याने भटकत असलेल्या एका महिलेची दैना बघून पाझर फुटला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. सदर महिला मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे निदर्शनास येताच तिला जाम येथील संत चावरा मानसिक आस्थापनेत दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : पोलीस म्हटले की कठोर मनाचे. त्यांच्याबाबत चिमुकल्यांसह वयोवृद्धांच्या मनात भीतीयुक्त आदर असतोच. परंतु, याच खाकीतील कठोर मनांना रस्त्याने भटकत असलेल्या एका महिलेची दैना बघून पाझर फुटला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. सदर महिला मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे निदर्शनास येताच तिला जाम येथील संत चावरा मानसिक आस्थापनेत दाखल केले.
समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचारी सुभाष आंदे व निरज वैरागडे यांच्या चमुला एक महिला नागपूर-हैद्राबाद महामार्गावर उबदा शिवारातील उड्डाण पुलाजवळ रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भटकत असल्याचे दिसले. पोलिसांनी आपले वाहन थांबवून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरूवातीला ती काय म्हणत आहे हेच पोलीस कर्मचाºयांना कळत नव्हते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सदर महिला मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे निदर्शनास येताच तातडीने महिला पोलीस कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले.
पोलीस शिपाई शितल धाबर्डे यांनी तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल्यावर पुन्हा एकदा महिलेला नाव विचारण्यासह ती कुठली आहे, कुठून आली आदीबाबत विचारणा करण्यात आली. परंतु, तीची भाषाच वेगळी असल्याने ती उत्तर भारतीय असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत उत्तर भारतीय असलेल्या झा नामक व्यक्तीचा पाचारण करून तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिने केवळ आपले नाव बिंदा व गाव भगवानपुर असे सांगितले.
सदर महिलेला समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे व उपनिरिक्षक दीपेश ठाकरे यांनी मोबाईल मधील यु-टूबचा वापर करून तिच्या गावाचा व्हिडीओ दाखविला. परंतु, ती वेगवेगळ्या गावांचे नाव घेत होती. सदर महिला रात्रीच्या सुमारास रस्त्यावरच राहिल्यास तिच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकत असल्याने तिला जाम येथील संत चावरा मानसिक आस्थापनेत दाखल करण्यात आले आहे.