पाण्याअभावी वाळल्या संत्राबागा खरिपाकरिता मजुरांकडून काढणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:10 PM2019-06-23T22:10:19+5:302019-06-23T22:10:44+5:30
मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव (लवणे) : मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वाळलेल्या संत्रा व बागायतधारकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
कारंजा तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संत्रा बागा जीवनाचा आधार ठरत होत्या. परंतु, यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत वाढलेले तापमान, त्यामुळे झळांच्या प्रमाणात झालेली वाढ व लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे अधिक प्रमाणात संत्रा बागा वाळल्या आहेत.
त्या वाळलेल्या बागा काढल्याशिवाय खरीप पिकांची लागवड करता येत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून संत्रा बागांची काढणी करून धुऱ्यावर ढीग लावल्या जात आहे. तालुक्यात सगळीकडे बागा वाळल्याने सरपणालाही कुणी तयार नाही. त्यामुळे बागायतदारांनी सरपणाचे ढीग धुºयावर रचून ठेवल्याचे दिसत आहेत. संत्रा बागा तयार करण्यासाठी सहा-सात वर्षांचा काळ लागतो. तसेच त्या जमिनीतून अल्प उत्पन्न हाती येत असते आणि यावर्षीच्या दुष्काळाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याने जड अंतकरणाने बागांवर जेसीबी चालवावा लागला. त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. आधीच निसर्गरूपी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला शासनाने आर्थिक मदत देऊन बागायतधारकांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
माझ्या शेतात ७०० संत्रा झाडे होती. त्यांना तयार करण्यासाठी ७ वर्षे लागली. परंतु विहिर कोरडी झाल्याने सर्वच्या सर्व झाडे वाळली. ती झाडे काढण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करावा लागला, अशा दुहेरी संकटात सापडले आहे. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
- मधुकर हिंगवे, बागायतदार, सेलगाव (लवणे).