एसटीने प्रवास करणारे आमदार पाहिले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 05:00 AM2021-08-11T05:00:00+5:302021-08-11T05:00:21+5:30
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे सन्माननीय व्यक्ती महाराष्ट्र विधान परिषद अथवा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन बसमधून महाराष्ट्र राज्यात तसेच आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजी, माजी आमदारांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन आमदारांनी पाच वर्षांत एसटीतून मोफत प्रवास केला, तर एका माजी आमदाराने एसटीतून प्रवास केल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. आलिशान महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आमदारांना सवलत कशाला? असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत आजी, माजी आमदारांना मोफत प्रवासाची सवलत देणारे परिपत्रक तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या काळात जारी करण्यात आले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे सन्माननीय व्यक्ती महाराष्ट्र विधान परिषद अथवा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन बसमधून महाराष्ट्र राज्यात तसेच आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येत आहे. जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी-पुलगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. चारपैकी दोन आमदारांनी, शिवाय एकमेव माजी आमदाराने एसटीतून प्रवास केला आहे.
कधी एसटीतून प्रवास केला आहे का?
पुणे येथील रेल्वे स्थानकावर उतरलो होतो. पुणे-मुंबई मार्गावरील एका हॉटेलमध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. हॉटेलात पोहोचण्याकरिता एसटीतून प्रवास केला होता. याला तीन वर्षांचा काळ लोटला.
-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.
शासनाकडून आमदारच नव्हे, तर माजी आमदारांनाही एसटीतून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. वाहकाच्या शेजारील आसन आमदारांकरिता राखीव असते. चार वर्षांपूर्वी वर्धा-नागपूर असा एसटी बसने प्रवास केला.
-डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.
चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?
आमदारांकडे स्वत:च्या मालकीची चारचाकी वाहने आहेत. टुमदार बंगला आणि सर्व सुखसोयी आहेत. असे असताना शासनाकडून त्यांना सवलती दिल्या जातात. सर्वसामान्यांना मात्र, कुठल्याही सोयी सवलती नाहीत. जनतेच्या पैशातूनच शासन त्यांना विविध सुविधा प्रदान करते. आर्थिकदृष्ट्या सक्षम आमदारांना कोणत्याही सुविधा शासनाने देऊ नये.
-सचिन बक्षी, वर्धा.
आमदारांना शासनाकडून विविध भत्ते, सवलती आणि सुविधा मिळतात. पेन्शनदेखील मिळते. आधीच ‘वेल सेटल्ड’ असलेल्या आमदारांना इतक्या सुख-सुविधा, भत्ते कशाला? शासनाने आमदारांना मिळणारे वेतन, भत्ते बंद करावेत, सवलतीही देऊ नये.
-गजानन पांडे, वर्धा.