हवालदिलांची समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी; पाच गावांतील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसानभरपाई
By अभिनय खोपडे | Published: August 18, 2023 04:45 PM2023-08-18T16:45:20+5:302023-08-18T16:46:27+5:30
भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश
वर्धा : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या विसर्गामुळे अनेक वर्षांपासून पाच गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली येऊन प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे.
सन २०१२ पासून निम्न वर्धा धरणातून १८०० ते दोन हजार क्युसेक प्रति सेकंद पाणी सोडले जात आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी जलाशयातून सोडण्यात आले तेव्हा तेव्हा रोहना, दहापूर, दिघी, सायखेडा, सोरटा या शिवारातील शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आली. अशातच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वारंवार संबंधितांना निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने जलसमाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
याची माहिती सुमित वानखेडे यांना मिळताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती दिली. शिवाय नागपूर येथे बैठक पार पडली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरच नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश भूसंपादन विभागाला देण्यात आले आहे.