जिल्ह्यात अवकाळी पाठ सोडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:14+5:30
घोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात रब्बी हंगामात तीन ते चारवेळा वादळवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मार्च, एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. यात केळीबागांसह पॉलिहाऊस आणि ग्रामीण भागात घरांची पडझड होत छत, टिनपत्रे उडून आर्थिक नुकसान झाले. अनेक डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप कापूस खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरातच कापूस लॉकडाऊन आहे. पर्यायाने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना हे पांढरे सोने मातीमोल भावात विकत आहेत. दुसरीकडे सीसीआयकडूनही कापसाला हमीभाव देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. रब्बी हंगामातील उत्पन्नावरच शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करतात. मात्र, अवकाळीने सातत्याने फटका दिल्याने अनेकांचे खरिपाचे नियोजन कोलमडल्याची स्थिती आहे.
हिंगणीत गारपिटीने लाखोंचे नुकसान
हिंगणी : गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वारा आणि पाणी व गारांचा अर्धा तास सारखा पाऊस पडला. यात केळीबागा, भाजीपाला, टमाटर, वांगी, मिरची पालक, कोथिंबीर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी संजय बाबुलाल डेकाटे यांच्या शेतामध्ये दोन एकर केळीचा बगीचा आहे. गुरुवारच्या गारपिटीने केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. यात त्यांचे लाखावर नुकसान झाले. वादळामुळे रवी डेकाटे यांच्या पिकांचेही नुकसान झाले. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी डेकाटे बंधूंनी केली आहे.
पॉलिहाऊस उडाल्याने तीन लाखांचे नुकसान
घोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.
केळीच्या बागा नावापुरत्या राहिल्या असल्या तरी महागड्या खर्चाच्या असलेल्या या बागांपासून अवघ्या दोन महिन्यांनी हातात उत्पन्न येण्याची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यात घनश्याम माहुरे, गजानन वरटकर, दीपक झोरे, नितीन माहुरे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तिसºयांदा सेलू परिसराला वादळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
अन् अनर्थ टळला
गावाच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतून मध्यरात्री आलेल्या वादळादरम्यान शॉर्ट सर्किट होत असल्याचे नागरिकांना दिसले. दरम्यान त्यांनी शाळेकडे धाव घेतली असता तेथे रद्दी पेटत असल्याचे दिसून आले. शाळेच्या टाक्यातील पाणी टाकून ती विझविण्यात आली. मात्र, ही रद्दी कुणी व केव्हा पेटविली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे वीज वितरणचे नुकसान होत आहे. वादळीवाऱ्यामुळे शेतशिवारातील वाकलेले वीजखांब व तुटलेल्या तारा त्वरित जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. शेतकरी शेतात शिल्लक असलेल्या पिकाची काळजी घेऊन काही उत्पन्न पदरी पाडू शकतो.
- दीपक झोरे, केळी उत्पादक, घोराड