टिकटॉक बंद झाले त्या दिवशी ‘तो’ जेवला नाही... त्याला आहेत सव्वा दोन लाख फॉलोअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 04:19 PM2020-07-15T16:19:18+5:302020-07-15T16:31:35+5:30
पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेला सालोड येथील सूरज राऊत हा अवघ्या काही वर्षांच्या काळात टिक टॉकवर १ हजार ६०० पेक्षा जास्त व्हिडीओ पोस्ट करून तब्बल २.१५ लाख फॉलोअर्सचा चाहता झाला. पण सध्या टिक टॉक या चिनी अॅपवर केंद्र शासनाने प्रतिबंध घातल्याने या टिक टॉक स्टारला सध्या पर्यायी अॅपची प्रतीक्षा आहे.
अवघ्या १५ सेकंदाचा व्हिडीओ तयार करून अनेकांना हसविण्याचे माध्यम तसेच अनेकांना आपले सुप्त गुण सादर करण्याचे चांगले व्यासपीठ टिकटॉक ठरू पाहत होते; पण सध्या या अॅपवर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. वर्धा शहरानजीकच्या सालोड (हिरापूर) येथील सुरज राऊत हा सामान्य कुटुुंबातील. शिवाय त्याने केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले. भाजी बाजारात श्रमाचे काम करून तो कुटुंबीयांना सहकार्य करतो. अशातच तीन वर्षांपूर्वी प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये सहज डाऊन लोड करता येईल अशा टिकटॉकवर फावल्या वेळेत व्हिडिओ बनवण्याचे त्याला छंद जडला.
मागील दोन वर्षांपासून तो व्हिडिओ बनवतो. पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही. पण इतर अॅप वापरताना त्याला तो आनंद मिळत नाही. त्याने आतापर्यंत सुमारे १ हजार ६०० पेक्षा जास्त व्हिडीओ पोस्ट केले केल्याचे तो सांगतो. त्याला २ लाख १५ हजार फॉलोअर्स आहे. २.८ मिलियन लाईक त्याचा व्हिडिओला चाहत्यांनी दिले आहेत.